भडगावात बिबट्याची दहशत : म्हशीच्या पारडूचा पाडला फडशा

भडगावात बिबट्याची दहशत : म्हशीच्या पारडूचा पाडला फडशा
बिबट्याला त्वरित जेरबंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी
भडगाव प्रतिनिधी
-भडगाव शहरासह परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून पिंपळगाव रस्त्यावरील शेतामध्ये असणाऱ्या एका म्हशीच्या पारडू बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ठार झाले आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भडगाव शहरातील पेठ भागात व पिंपळगाव स्त्यावरील किशोर नारायण पाटील यांच्या शेतात शेडमध्ये बांधलेले म्हशीचे पारडू रात्री तीन वाजेच्या सुमारास बिबट्याने फाडल्याची घटना घडली असून याबाबत शेतकरी व मजूर वर्गामध्ये बिबट्याच्या दहशतीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्याला वनविभागाने त्वरित जेरबंद करावे अशी मागणी होत आहे. दरम्यानया बिबट्याने गेल्या दोन दिवसांपूर्वी पिंपळगाव रस्त्यावरील शेख मुख्तार शेख शफिक यांच्या शेतात एक रेडा ,पारडू फाडले होते. तीच घटना आज पुन्हा किशोर पाटील यांच्या शेतात झाली.
ही घटना आज सकाळी नऊ वाजता उघडकीस आली किशोर पाटील हे सकाळी आपल्या शेतात गेले त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत भडगाव शहरातील शेतकरी व मजूर वर्गामध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले असून शेतांमध्ये जाण्यास घाबरत आहेत तरी वनविभागाने याचा बंदोबस्त करावा व बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.