..म्हणून चौधरी बंधू बदनाम झाले!
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी ।जळगाव जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या यादीत ज्या दोन लोकप्रतिनिधींचे नाव घेतले जाते ते म्हणजे भुसावळचे संतोष चौधरी आणि अनिल चौधरी. एक दबंग आणि कुणालाही न जुमानणारे नेतृत्व म्हणून दोघांची ओळख आहे. भुसावळ शहरच नव्हे तर संपूर्ण राज्यातील राजकीय आणि सामाजिक पदाधिकारी संतोष आणि अनिल चौधरी यांना ओळखून आहेत. चौधरी बंधूंच्या नावाची राजकीय व्यक्ती म्हणून ओळख असली तरी दबंग व्यक्तीमत्व म्हणून देखील त्यांना ओळखले जाते. मुळात चौधरी बंधू गुंड आहेत कि त्यांनी गुंडगिरी संपवली हेच अनेकांना माहिती नसल्याने विरोधकांनी त्यांची बदनामी सुरु केली. दिग्गज राजकारण्यांना ते थेट टक्कर देत असल्याने सर्वांनीच एक होत त्यांना हळूहळू बाजूला करण्याचा प्रयत्न केला मात्र ते सर्वांना पुरून उरले. एकंदरीत कुणी आपल्यापेक्षा मोठा होत असेल तर त्याला बदनाम करणे हे सोपे काम आजवर करण्यात आले. विरोधकांच्या एकीने चौधरी बंधू बदनामीचे बळी ठरले.
संतोष चौधरी आणि अनिल चौधरी यांच्याबद्दल अनेकांना आजवर अनेक गैरसमज आहेत. विशेष म्हणजे तरुण आणि महिलावर्गाला चौधरी बंधूंबद्दल फारशी माहिती नाही. भुसावळ हि कर्मभूमी असलेले चौधरी बंधू यावल तालुक्याचे भूमिपुत्र आहेत. एका वाहन चालकाच्या कुटुंबात जन्माला आलेल्या चौधरी बंधूंचा संघर्ष फार मोठा आहे. अत्यंत गरिबीतून दिवस काढलेल्या चौधरी बंधूचे वडील वाहन चालक होते. त्यानंतर त्यांनी हॉटेलवर काम केले. आई भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत होत्या. छबिलदास चौधरी यांनी भुसावळ आपली कर्मभूमी निवडल्यावर तिथेच स्थायिक झाले. भाड्याच्या लहानश्या गळक्या खोलीतून त्यांचा खडतर प्रवास सुरु झाला.
गुंडगिरीच्या शहरात जीवन कठीण
भुसावळ शहराची आज असलेली ओळख खून का बदला खून अशी झालेली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक खून बहुदा भुसावळातच होत असावे. साधारणतः ३० ते ४० वर्षांपूर्वी भुसावळ शहरात प्रचंड गुंडगिरी होती. गल्लोगल्ली दादा, जबर मंडळी होती. सर्वसामान्य व्यक्ती त्यांच्या नावाने देखील घाबरत होता. खून, हाणामारी, दंगली हा तेव्हाच इतिहास होता. भययुक्त वातावरण पाहत चौधरी कुटुंब आपला दिनक्रम घालवीत होते. चौधरी बंधू देखील असे वातावरण लहानपणापासून पाहत होते. कठीण परिस्थितीत साधारण स्वभावाचे वडील कुटुंब कसे सांभाळत होते हे त्यांनी फार जवळून पहिले होते.
प्रचंड मेहनतीने कमावले नाव
संतोष चौधरी आणि अनिल चौधरी यांचे वडील छबिलदास चौधरी यांचे कुटुंब मोठे असल्याने घरखर्च भागवायला त्यांना सावकारी कर्ज देखील घ्यावे लागत होते. वडिलांची दगदग लक्षात घेता कमी वयात दोन्ही भावांनी आपल्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी उचलली. हॉटेलवरील काम सोडल्यावर छबिलदास चौधरी यांनी स्वतःचा ढाबा सुरु केला. संतोष आणि अनिल चौधरी देखील ढाबा सांभाळू लागले. विशेषतः वडील आपल्या वाहनाने कुठे जात असतील तेव्हा जबाबदारीने चौधरी बंधूंना आपली भूमिका पार पाडावी लागत होती. पहाटे लवकर उठून भाजी बाजारातून भाजीपाला खरेदी करण्यापासून हॉटेलमध्ये टेबल पुसण्यापर्यंत सर्व कामे दोन्ही भाऊ जबाबदारीने पार पाडत होते. प्रचंड मेहनत घेऊन दोघांनी हॉटेल व्यवसायात नाव कमावले.
राजकारणाची सुरुवात आणि भुसावळात नांदली शांतता
हॉटेल आणि भाजीपाल्याचा व्यवसाय सांभाळतांना चौधरी बंधूंची जनमानसात चांगली ओळख झाली. त्यातच हॉटेलवर येणाऱ्या चांगल्या-वाईट ग्राहकांना सांभाळतांना त्यांना हिंमत देखील आली. भुसावळ शहरातील काही प्रस्थापित राजकारण्यांनी त्यांना जवळ केले. हळूहळू दोघांचा राजकीय क्षेत्रात प्रवेश झाला. भुसावळ नगरपरिषदेपासून झालेली त्यांची सुरुवात आमदारपर्यंत येऊन पोहचली. भुसावळ शहरात पूर्णतः सक्रिय झाल्यानंतर दोन्ही भावांची शहरावर चांगली पकड झाली. शहरातील गुंडगिरी त्यांनी शांत केली. आपल्या खमक्या आणि दबंग स्वभावाने त्यांनी अनेकांना शांत करीत त्यांच्या रोजगाराची व्यवस्था करून दिली. समाजासमाजात असलेले तेढ दूर केल्याने जातीय सलोखा भुसावळात निर्माण झाला. परिणामी भुसावळात शांतता नांदू लागली.
दिग्गजांशी घेतला पंगा आणि वाढल्या अडचणी
राजकारणात आल्यानंतर चौधरी बंधूंनी कमी वेळेत मोठी मजल मारली. अन्याय, अत्याचार आणि दबाव सहन करण्याचा स्वभाव नसल्याने आपल्या स्वभावामुळे त्यांनी जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील अनेकांशी त्यांनी पंगा घेतला. शाब्दिक वाद वाढू लागल्याने मोठे नेते देखील त्यांना पाण्यात पाहू लागले. चौधरी बंधूंना आताच बाजूला न केल्यास भविष्यात आपले महत्व कमी होईल अशी धास्ती अनेकांना वाटत होती. सर्व सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येत चौधरी बंधूंना एकटे पडले. हळूहळू काही गुन्हे दोघांवर दाखल झाले. काही गुन्ह्यात त्यांना अडकवण्यात आले. आर्थिक आणि मानसिक कोंडी करीत दोन्ही भावांची राज्यभरात बदनामी करण्यात आली. शासकीय यंत्रणांचा उपयोग करीत चौधरी बंधूंना जायबंदी केल्यानंतर विरोधकांनी त्यांची बदनामी सुरु केली.
स्वतःचा स्वार्थ न बघता अनेकांना केले मोठे
संतोष आणि अनिल चौधरी यांनी कधीही स्वतःचा स्वार्थ पाहीला नाही. सर्व समाजातील अनेकांना मोठे करण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न राहिला. अनेकांना नगरपरिषदेत नोकरी दिली तर अनेकांना स्वतःचा रोजगार सुरु करण्यासाठी आर्थिक मदत केली. कुणाला रिक्षा घेऊन दिली तर कुणाला व्यवसायासाठी दुकान, जागा मिळवून दिली. इतकंच काय तर आपल्या स्वतःच्या वाट्याला असलेली पदे देखील त्यांनी इतरांना वाटून दिली. स्वतःच्या कुटुंबात पदे न ठेवता कार्यकर्त्यांना त्यांनी मोठे केले. स्वतःच्या खाजगी स्वीय सहाय्यकाला आमदार करणाऱ्या मोजक्या लोकप्रतिनिधींमध्ये संतोष चौधरी यांचे नाव आहे.
गुंड हटविले म्हणून बदनाम झाले
१९७०-८० च्या दशकात जळगाव शहर आणि भुसावळ शहर गुंडगिरीच्या बाबतीत प्रचंड गाजलेले शहर होते. जळगावात सुरेशदादा जैन यांनी सर्व गुंडगिरी मोडीत काढून शांतता प्रस्थापित केली. दंगली रोखल्या. अनेकांना मोठमोठी राजकीय पदे मिळवून दिली. भुसावळ शहरात तोच कित्ता चौधरी बंधूंनी गिरवला. दबंगगिरी करीत गुंडांना बाजूला करून शहरात शांतता आणली. गुंडगिरी बाजूला सारतांना स्वतःच्या बचावासाठी कधीकधी शस्त्र देखील हाती घ्यावे लागते. चौधरी बंधू देखील स्वतःचे रक्षण करताना पुढे आले आणि बदनाम झाले. काहीही असले तरी तेव्हाच काळ ज्यांना माहिती आहे तो वर्ग आज देखील संतोष आणि अनिल चौधरी यांना ओळखून आहे. प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आज आदरयुक्त भीती आहे. भविष्यात देखील जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी चौधरी बंधुंसारख्या नेतृत्वाची जिल्ह्याला गरज आहे.