मेहुणबारे शेतात लागली आग, वाहनांसह बियाणे, चारा खाक

महा पोलीस न्यूज । भूषण शेटे । चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे दि.१२ ऑगस्ट रोजी पहाटे २.५० वाजेच्या सुमारास गट क्रमांक ११/०२ मधील दादा उमचंद सोनवणे यांच्या शेतात आग लागल्याची घटना घडली. मेहुणबारे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रवीण दातरे यांनी यांनी तात्काळ नगरपरिषद अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली. आगीत वाहनांसह लाखोंचे नुकसान झाले आहे.
दि.१२ ऑगस्ट रोजी रात्री २:५० वाजता मेहूनबारे (ता.चाळीसगाव) येथील गट क्रमांक ११/०२ मधील दादा उमचंद सोनवणे यांच्या शेतात आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मेहूनबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना तातडीने कळवली. जोशी यांनी ही माहिती त्वरित अग्निशमन अधिकारी अक्षय घुगे यांना दिली, ज्यामुळे अग्निशमन दलाची टीम तात्काळ घटनास्थळी रवाना झाली.
घटनास्थळी पोहोचताच अग्निशमन दलाला शेतातील खळ्याला, एका फोर-व्हीलर वाहनाला, टू-व्हीलर वाहनाला, बी-बियाण्यांना आणि चाऱ्याच्या कट्ट्यांना लागलेली आग दिसून आली. अग्निशमन अधिकारी अक्षय घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाने त्वरित कारवाई करत आग पूर्णपणे विझवली. या यशस्वी कारवाईमुळे मोठी हानी टळली आणि परिसरातील नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.
अग्निशमन कारवाईत सहभागी कर्मचारी
आग विझवण्यासाठी अग्निशमन अधिकारी अक्षय घुगे, फायर वाहन चालक बापू ठाकूर, बापू चौधरी, फायरमन चंद्रकांत राजपूत, सागर देशमुख, रणजीत जाधव, संदीप देशमुख, राहुल राठोड, शशीकांत चौधरी, फायर कंट्रोल रूम विजय चौधरी यांनी परिश्रम घेतले. या कारवाईत अग्निशमन दलाच्या तत्परतेचे आणि कार्यक्षमतेचे कौतुक परिसरातील नागरिकांनी केले. अक्षय घुगे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने दाखवलेल्या समन्वय आणि शौर्यामुळे ही आग विझवण्यात यश मिळाले. स्थानिक प्रशासनानेही या घटनेनंतर शेतकऱ्यांना आग लागण्यापासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.






