वादळी वाऱ्याचा फटका : जळगाव जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणा कोलमडली, महावितरणचे युद्धपातळीवर काम सुरू

वादळी वाऱ्याचा फटका : जळगाव जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणा कोलमडली, महावितरणचे युद्धपातळीवर काम सुरू
जळगाव (प्रतिनिधी) – बुधवारी सायंकाळी आलेल्या तीव्र वादळी वाऱ्यामुळे जळगाव जिल्ह्यात वीज वितरण व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. महावितरणच्या अधोसंरचनेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या तांत्रिक पथकांनी युद्धपातळीवर दुरुस्तीची मोहीम हाती घेतली आहे.
वादळामुळे एकूण १५ उपकेंद्रांची वीज सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. मात्र, अथक प्रयत्नांती त्यापैकी ५ उपकेंद्रांची सेवा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले आहे. उर्वरित १० उपकेंद्रांचे दुपारी ४ वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे उद्दिष्ट महावितरणने निश्चित केले आहे.
या आपत्कालीन परिस्थितीत महावितरणच्या विविध विभागातील कर्मचारी आणि तांत्रिक पथके सलग दिवसरात्र कामाला लागली आहेत. जिल्ह्यात वीज खांब, ट्रान्सफॉर्मर आणि अन्य साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. इतर विभागांतून अतिरिक्त कर्मचारीही तातडीने मागवण्यात आले आहेत.
महावितरणकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले असून, कोणत्याही तुटलेल्या किंवा उघड वीजवाहिनीजवळ जाणे टाळावे, सुरक्षित अंतर राखावे आणि आवश्यक ती माहिती संबंधित कार्यालयात तात्काळ कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
महावितरणने स्पष्ट केले आहे की, नागरिकांच्या सुरक्षेलाच सर्वोच्च प्राधान्य असून वीज सेवा पूर्ववत करताना कोणताही धोका पत्करला जाणार नाही. वीज पुनर्प्राप्तीचे काम प्राधान्याने, जलदगतीने आणि सुरक्षित पद्धतीने सुरू आहे.