भडगावच्या सुपुत्राला वीरमरण! जवान स्वप्निल सोनवणे शहीद
सैनिकी सन्मानाने अंत्यसंस्कारासाठी पार्थिव गावाकडे रवाना

महा पोलीस न्यूज । दि.११ ऑगस्ट २०२५ । देशसेवा बजावताना वीरमरण आलेल्या भडगाव तालुक्यातील गुढे गावचे सुपुत्र, जवान स्वप्निल सोनवणे यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. ५७ व्या वाहिनी सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले कॉन्स्टेबल स्वप्निल सोनवणे यांचा ९ ऑगस्ट रोजी कर्तव्यावर असताना दुर्दैवी मृत्यू झाला.
दि.९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७.२३ वाजता बीओपी ढोलागुरी येथे घडली. जवान सोनवणे हे सीमा फ्लड लाईट खांब क्रमांक १७ दुरुस्त करण्याचे काम करत असताना विजेचा धक्का बसून काँक्रिट बेसवर पडले. त्यांना तत्काळ बीएसएफ रुग्णवाहिकेतून सहकाऱ्यासह बाळुरघाट जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र सायं. ८.३५ वाजता डॉक्टरांनी त्यांना दाखल केल्यावर मृत घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर समोर येईल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
एका कर्तव्यदक्ष जवानाला गमावल्याने बीएसएफमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. जवान स्वप्निल यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी गुढे येथे आणले जात आहे. १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता त्यांच्यावर सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. एका शूर वीराला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव आणि परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी शक्यता आहे.
स्वप्निल सोनवणे यांचे बलिदान देशासाठी आणि गावासाठी कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने सोनवणे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगी सारा देश त्यांच्यासोबत आहे.






