जानवे वनक्षेत्रातील महिला हत्या प्रकरणाचा उलगडा ; अनिल संदानशिव विरोधात खुनाचा गुन्हा दाखल

जानवे वनक्षेत्रातील महिला हत्या प्रकरणाचा उलगडा ; अनिल संदानशिव विरोधात खुनाचा गुन्हा दाखल
अमळनेर : दिनांक २३ जुलै २०२५ रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ५९/२०२५ नोंदविण्यात आला होता. घटनास्थळ हे पारोळा पोलीस ठाणे हद्दीतील जानवे वनक्षेत्रात आढळून आल्याने यासंबंधित तपास सुरू असताना, सदर मृत्यू खून असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड विधान संहितेच्या कलम १९३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी केलेल्या तांत्रिक व घटनास्थळीय तपासणीत मृत महिला वैजंताबेन भगवान भोई (वय ५०, रा. कुबेरनगर, सुरत, गुजरात) हिची ओळख पटविण्यात आली. तपासादरम्यान तिच्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साखळी उलगडली असता अनिल गोविंदा संदानशिव (रा. सुमठाणे, ता. पारोळा) याच्याशी सतत संपर्कात असल्याचे उघड झाले. २ मे ते ५ मे २०२५ या कालावधीत दोघांमध्ये नियमित संवाद झाल्याचे रेकॉर्ड तपासात समोर आले.
तपास अधिक खोलात गेल्यावर निष्पन्न झाले की, आरोपीने पीडितेला फसवून, काहीतरी अमिष दाखवून जानवे वनक्षेत्रात नेत तिचा निर्घृण खून केला. या घटनेनंतर अमळनेर पोलीस स्टेशनला २५ जुलै रोजी गुन्हा क्रमांक ३०४/२०२५ नोंदविण्यात आला असून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. यामध्ये तांत्रिक पुरावे, घटनास्थळी सापडलेले मानवी अवशेष, मोबाईल संवाद आदी तपशीलाआधारे आरोपीचा सहभाग निष्पन्न करण्यात आला.
संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक अशांक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या सूचनांनुसार करण्यात आली. तपास पथकात पोनि दत्तात्रय निकम, पोनि संदीप पाटील, पोउपनि शरद बागल, पोउपनि नामदेव बोरकर, पोहका कैलास शिंदे, पोहेका काशिनाथ पाटील, पोको सागर साळुंखे यांनी सहभाग घेतला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करत आहेत.