एस.टी. बस रस्त्यामध्ये अडवून चालकाला दमदाटी.; चौघाविरुद्ध गुन्हा

एस.टी. बस रस्त्यामध्ये अडवून चालकाला दमदाटी.; चौघाविरुद्ध गुन्हा
मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
मुक्ताईनगर प्रतिनिधी तालुक्यात एस.टी. बस चालकाला भररस्त्यात अडवून शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींसह ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की जीवन सुरवाडे हे मुक्ताईनगर आगारामध्ये चालक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी, १९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता बस क्रमांक MH-06 S-8631 ने मुक्ताईनगर ते फैजपूर या फेरीसाठी ते वाहक सुषमा रतन बोदडे यांच्यासह रवाना झाले होते.
संध्याकाळी ५.५० वाजता फैजपूरहून परत येताना सावदा, उदळी, चिंचोल, चांगदेव मार्गे प्रवासी घेऊनयेत असताना सायंकाळी सुमारे ७.३० वाजता वढवे फाटा ते हरताळा फाटा दरम्यान रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाची कार उभी होती. त्या कारमधील चालकाने अचानक फ्लॅश लाईट दिल्याने एस.टी. चालकाने बस हळूवारपणे बाजूला घेत कारला मार्ग देण्याचा प्रयत्न केला. मात्र कारमधील चालक खाली उतरून चालकास आरडाओरड करत गाडी का थांबवली नाही, असा जाब विचारू लागला.
बसमधील वाहक सुषमा बोदडे व प्रवाशांनी मध्यस्थी केल्यानंतर एस.टी. बस पुढे रवाना झाली. त्यानंतर वाहकाने सदर कारचालकाचे नाव अंकुश राजेंद्र चौधरी (रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर) असल्याचे चालकास सांगितले.यानंतर कोथळी गावाजवळील आशादेवी मंदिराजवळ सदर कारने एस.टी. बसचा पाठलाग करून बससमोर आडवी लावण्यात आली. कारमधून उतरून अंकुश चौधरी व त्याच्या तीन साथीदारांनी एस.टी. चालकास शिवीगाळ करत मारहाण केली. इतकेच नव्हे तर “एस.टी. वाले फार माजले आहेत” असे म्हटले.
याप्रकरणी चालक जीवन सुरवाडे यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये अंकुश चौधरी व तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहे का चंद्रकांत बोदडे करीत आहे.






