“ॲनिमिया मुक्त गाव” मोहिमेची जिल्हा परिषद जळगाव तर्फे जोरदार अंमलबजावणी

जळगाव :जिल्हा परिषद जळगावच्या माध्यमातून “ॲनिमिया मुक्त गाव मोहिम” जिल्ह्यातील समृद्ध ग्रामपंचायात अभियानात सहभागी असलेल्या 300 ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश ग्रामीण भागातील स्त्री-पुरुष, किशोरवयीन मुले-मुली तसेच गर्भवती व स्तनदा माता यांच्यामधील रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य पातळीवर ठेवणे हा आहे.
या मोहिमेत खालील महत्त्वाच्या उपक्रमांचा समावेश आहे –
• गर्भवती व स्तनदा माता, किशोरवयीन मुले-मुली तसेच प्रजननक्षम वयोगटातील महिलांची हिमोग्लोबिन तपासणी.
• आयर्न फोलिक ॲसिड (IFA) टॅबलेट आणि आवश्यक पूरक आहाराचे नियमित वितरण.
• पोषणविषयक जनजागृती, योग्य आहार पद्धती व जीवनशैलीविषयी मार्गदर्शन.
• ग्रामपंचायत, आशा, अंगणवाडी सेविका, ANM यांच्या सक्रिय सहभागातून घराघरांत मोहिम पोहोचविणे.
• शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेऊन व्यापक जनजागृती अभियान.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती . मिनल करनवाल यांनी सांगितले की, “ॲनिमिया ही एक गंभीर आरोग्य समस्या असून ती मातामृत्यू, बालमृत्यू तसेच शारीरिक व बौद्धिक विकासात अडथळा आणते. ही मोहीम लोकसहभागातून प्रभावीपणे राबवून जळगाव जिल्हा ॲनिमिया मुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला आहे.”
जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचा या मोहिमेत समन्वय असून जिल्हा प्रशासनाने ग्रामपातळीपासून तालुका व जिल्हा स्तरापर्यंत कार्ययोजना तयार केली आहे.
जिल्हा परिषद जळगाव तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन ॲनिमिया निर्मूलनासाठी हातभार लावावा.






