स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विलास भोळे यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नियुक्ती

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्याचे नामवंत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विलास दिनकर भोळे यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत (MMC) वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणांची छाननी करणारे विषयतज्ज्ञ म्हणून निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम १९६५ अंतर्गत स्थापन झालेल्या या परिषदेच्या मुंबई येथील मुख्यालयातून नुकतेच पत्र जारी करण्यात आले. परिषदेचे माननीय प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे.
डॉ. भोळे यांना रुग्णांचा वैद्यकीय इतिहास, उपचारांची कागदपत्रे आणि संबंधित क्लिनिकल अहवालांचा अभ्यास करून संबंधित प्रकरणात उपचाराची पद्धत अपेक्षित दर्जानुसार झाली आहे का, याचे परीक्षण करायचे आहे. तसेच, निष्काळजीपणा झाला आहे का याविषयी तज्ज्ञ मत नोंदवायचे आहे.
परिषदेने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “आपले ज्ञान आणि अनुभव प्रकरणांच्या सखोल छाननीसाठी अत्यंत मोलाचे ठरेल. यामुळे रुग्णांना न्याय देण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल.”
तसेच, परिषदेच्या नियमांनुसार डॉ. भोळे यांना प्रवास व इतर भत्त्यांचा लाभ मिळणार आहे. त्यांच्या सेवांचा उपयोग परिषदेला गरजेनुसार करण्यात येणार आहे.
डॉ. भोळे हे गेल्या अनेक वर्षांपासून जळगावात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत असून, त्यांच्या अनुभवाचा लाभ आता राज्यस्तरीय पातळीवर होणार आहे. या निवडीमुळे जळगावच्या वैद्यकीय क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.






