धामणगाव तलाठींची धडक कारवाई, अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरासह जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतूकीचे सत्र थांबतच नसून महसुली अधिकारी निवडणूक कामात व्यस्त असल्याचा वाळूमाफिया फायदा घेत आहेत. धामणगाव परिसरात तलाठी यांनी धडक कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले आहे.
जळगाव जिल्ह्यात सध्या सर्वत्र नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असून उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेसाठी जवळपास सर्वच महसूल अधिकारी व्यस्त झाले असून महिनाभरापासून त्यांची नियुक्ती त्या कामासाठी करण्यात आली आहे. महसुली व्यस्थतेचा फायदा वाळूमाफिया घेत असून जोरदार वाळू चोरी सुरू आहे.
धामणगाव तलाठी रवीना पवार यांनी सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास धडक कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले आहे. मंडळाधिकारी राजेश भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. धामणगाव परिसर आणि परिसरातील गावातून होणाऱ्या वाळू वाहतुकीला या कारवाईने ब्रेक लागणार आहे.






