पिंप्राळा हुडकोत अवैध गॅस रिफिलिंगवर धडक कारवाई

पिंप्राळा हुडकोत अवैध गॅस रिफिलिंगवर धडक कारवाई
डीवायएसपींच्या पथकाचा छापा ; १२ सिलिंडर व पंप जप्त
जळगाव : शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून अवैधरित्या वाहनांत गॅस भरणाऱ्या दोन रिफिलिंग सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्या विशेष पथकाने केलेल्या या कारवाईत एकूण १२ अवैध गॅस सिलिंडर तसेच गॅस भरण्यासाठी वापरला जाणारा इलेक्ट्रिक पंप व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली.
पिंप्राळा हुडको परिसरात पत्री शेडमध्ये बेकायदेशीररीत्या उभारण्यात आलेल्या एका गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा टाकण्यात आला असता, तेथे पाच घरगुती गॅस सिलिंडर व गॅस वाहनात भरण्यासाठी वापरला जाणारा इलेक्ट्रिक पंप आढळून आला. तर दुसऱ्या ठिकाणी एका घरामध्येच अवैधरीत्या सेंटर सुरू असल्याचे निदर्शनास आले. या घरातून सात गॅस सिलिंडर पोलिसांनी जप्त केले. दोन्ही ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसताना दाट वस्तीमध्ये हा धोकादायक व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले आहे.
विशेष म्हणजे, रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या या परिसरात हे अवैध सेंटर अनेक महिन्यांपासून सुरू असल्याची चर्चा असूनही, ते बीट मार्शलांच्या निदर्शनास कसे आले नाहीत, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. इतक्या काळापासून सुरू असलेल्या बेकायदेशीर गॅस रिफिलिंगकडे दुर्लक्ष झाले का, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ईच्छादेवी चौक परिसरातील एका अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर स्फोटाची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षकांनी शहरातील अशा अवैध सेंटरवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतरच डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्या पथकाने शहरातील दाटवस्तीत सुरू असलेल्या वाहनांत गॅस भरणाऱ्या सेंटरवर लक्ष केंद्रीत करून ही कारवाई केली.
या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, अवैध गॅस रिफिलिंगमुळे होणारा संभाव्य धोका लक्षात घेता शहरात आणखी अशा सेंटरची तपासणी केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.






