पुण्यात अल्पवयीन मुलगी गर्भवती; १५ वर्षीय मुलासह महिलेवर गुन्हा दाखल

पुणे: पुणे शहराला हादरवून सोडणारी एक गंभीर घटना रविवारी (२४ ऑगस्ट) समोर आली आहे. फिट्सचा झटका आल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलेल्या १४ वर्षे ८ महिने वयाच्या मुलीला डॉक्टरांनी तपासले असता ती ८ महिन्यांची गर्भवती असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले. या प्रकरणी मुलीच्या आईने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १४ वर्षीय मुलगी आणि एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाची गेल्या दोन वर्षांपासून मैत्री होती. या काळात त्या मुलाने मुलीशी वारंवार लैंगिक संबंध ठेवले. इतकेच नव्हे, तर त्याने मुलीला एका महिलेकडे नेऊन तिच्यासोबतही लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने तातडीने पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, आरोपी अल्पवयीन मुलगा आणि त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






