Crime

जळगावात रिक्षातून लूट करणारी टोळी जेरबंद; २५ हजारांची रक्कम जप्त

जळगांवात रिक्षातून लूट करणारी टोळी जेरबंद; २५ हजारांची रक्कम जप्त

जळगांव प्रतिनिधी जळगांव शहरात वृद्ध व्यक्तींना रिक्षात बसवून त्यांची लूट करणाऱ्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारासह दोन साथीदारांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरलेली २५ हजारांची रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई ‘नेत्रम’ प्रकल्पांतर्गत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने यशस्वी झाली आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , दि. २९ मार्च २०२५ रोजी नांदुरा (जि. बुलढाणा) येथील रहिवासी शेख फिरोज शेख शादुल्ला (वय ५०) हे जळगावातील अजिंठा चौफुली येथे नांदुरा येथे जाण्यासाठी थांबले होते. त्यांच्याकडे प्लास्टिकच्या पिशवीत २५ हजार रुपये रोख होते. त्याचवेळी एक रिक्षा तिथे थांबली. रिक्षा चालकाने “आम्ही खामगावला जात आहोत, तुम्हाला कुठे जायचे आहे?” असे विचारले. फिरोज यांनी होकार देताच त्यांना मागील दोन प्रवाशांसह रिक्षेत बसवले गेले. काही अंतर गेल्यानंतर मागे बसलेल्या प्रवाशांनी “आम्हाला नीट बसता येत नाही, तुम्ही खाली उतरा आणि दुसऱ्या गाडीत जा” असे सांगितले. फिरोज खाली उतरले आणि त्यांनी पिशवी तपासली असता, तिला कट मारलेला दिसला आणि पैसे गायब झाले होते.

त्यांनी रिक्षा थांबवण्यासाठी ओरडले, पण रिक्षा वेगाने निघून गेली. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

नेत्रम’ प्रकल्पाची मदत

जळगांव शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांनी सुरू केलेल्या ‘नेत्रम’ प्रकल्पांतर्गत शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी जोडलेले आहेत. या गुन्ह्याच्या तपासासाठी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत आणि पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तपासाला सुरुवात केली. पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, पोना प्रदीप चौधरी, पोकॉं राहुल रगडे, विशाल कोळी, रतन गिते आणि गणेश ठाकरे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक संशयित रिक्षा आढळली. रिक्षा चालक वसीम कय्युम खाटीक (रा. मास्टर कॉलनी, जळगांव) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने आपले साथीदार तौसीफ खान सत्तार खान (रा. रामनगर, मेहरूण, जळगांव) आणि एका अल्पवयीन मुलासह हा गुन्हा केल्याचे सांगितले.

तौसीफ हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर जबरी चोरी आणि चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत.पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून फिरोज यांची चोरलेली २५ हजारांची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली बजाज कंपनीची रिक्षा (क्रमांक MH१९-CW-५२५०) जप्त करण्यात आली.

नागरिकांना आवाहन

या गुन्ह्याचा उलगडा ‘नेत्रम’ प्रकल्पाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे झाला आहे. जळगांव शहरातील नागरिकांनी आपला परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि ते ‘नेत्रम’ प्रकल्पाला जोडावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.पोलिसांचे कौतुकया यशस्वी कारवाईबद्दल एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ‘नेत्रम’ प्रकल्पामुळे जळगांव शहरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होत असल्याचे दिसून येते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button