‘त्या’ हॉटेल चालकाने लिहिल्या होत्या २ चिठ्ठ्या, पोलीस चौकशी करणार?

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील महेश चौकात भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेच्या मालकाकडून सततच्या त्रासाला कंटाळून संत निवृत्तीनगर येथील आशिष मधुकर फिरके (वय ४८) यांनी रोनक हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी दि. १४ मध्यरात्री १:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष फिरके यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटनुसार ते गेल्या तीन वर्षांपासून रिंगरोडवरील रोनक हॉटेलमध्ये व्यवसाय करत होते. हॉटेलसाठी तीन वर्षांचे करारनामे केले होते आणि त्यांनी मोठी गुंतवणूक केली होती. मात्र, जागा मालकाने अचानक जागा खाली करण्याचा तगादा लावला आणि सतत त्रास दिला. जागा मालकाचा मुलगा वेळोवेळी धमक्या देत होता, असे फिरके यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी लिहिले. ही चिठ्ठी त्यांनी सोशल मीडियावर स्टेटस म्हणून ठेवली होती.
कुटुंबियांनी अद्याप तक्रार दिली नाही
फिरके यांच्या परिचितांनी रात्री त्यांचे स्टेटस पाहिल्यानंतर सुसाइड नोट दिसली. त्यांनी तातडीने जिल्हापेठ पोलिसांना कळवले. पोलिसांनी रोनक हॉटेलमध्ये धाव घेतली असता, फिरके यांचा मृतदेह आढळला. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, दोन दिवस उलटले तरी याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. कुटुंबियांनी अद्याप तक्रार दिली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अकस्मात मृत्यूची नोंद, तपास सुरू
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. काल पोलिसांच्या फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी तपासणी केली. फिरके यांच्या सुसाइड नोटसह त्याठिकाणी आणखी एक सुसाईड नोट मिळून आली आहे.
पोलीस सखोल चौकशी करणार?
एक हॉटेल चालकाने सुसाईड नोट लिहून तसेच स्टेटसला ठेवून आत्महत्या केली तरीही पोलिसांचा तपास हव्या त्या गतीने सुरु असल्याचे दिसून येत नाही. मयताच्या मोबाईलचे सीडीआर, मेसेज, हॉटेलचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता काही हाती लागू शकते.






