ब्रेकिंग : जळगाव एमआयडीसीमध्ये हाफ चड्डी गँगचा धुमाकूळ, दोन कंपनीत डल्ला

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील उद्योजक सध्या दहशतीखाली असून एकाच दिवसात दोन कंपनीत हाफ चड्डी गँगने डल्ला मारला आहे. दोन कंपनीतून लाखोंचा मुद्देमाल चोरट्यांना लांबवला आहे. एमआयडीसी विभागातर्फे पुरेशा सुविधा पुरवल्या जात नसल्याने चोरट्यांचे फावले होत आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी परिसरात असलेल्या ई सेक्टरमध्ये जिग्नेश शरद शेठ वय-४५ यांची ग्रीन एन इको सोल्युशन ही कंपनी आहे. शुक्रवारी कुटुंबीय बाहेरगावी गेलेले असल्याने ते वरील माळ्यावर असलेल्या घरात एकटेच झोपलेले होते. पहाटे २ वाजेच्या सुमारास ३ चोरट्यांनी कंपनीचे शटर वाकवून आत प्रवेश केला आणि कार्यालयातील कपाटामधील असलेली ३ लाखांची रोकड लंपास केली.
दुसऱ्या घटनेत, पंकज गुणवंत टोगळे यांच्या आर.जी.इंटरप्रायझेस या कंपनीतही चोरी झाली आहे. टोगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कंपनीतून चोरट्यांनी १ लाख ८ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. या घटनेतही तीन अज्ञात चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी करताना कैद झाले आहेत. एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही घटनांची नोंद करून तपास सुरू केला आहे.
संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
दोन्ही कंपन्यांमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे पहाटे २.२० ते ३.३० वाजेच्या दरम्यान चोरी करताना दिसत आहेत. दोन्ही कंपन्यांमधील चोरीचा प्रकार सारखाच असल्याने, एकाच टोळीने दोन्ही ठिकाणी चोरी केल्याचा पोलिसांचा संशय आहे. तिघे चोरटे हाफ चड्डी घालून आणि चेहऱ्याला मोठा रुमाल बांधून आलेले होते.
कर भरून उद्योगांना सुविधा नाही
या घटनेमुळे एमआयडीसी परिसरातील उद्योजक, कामगार आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एमआयडीसीतील उद्योजक दरवर्षी लाखो रुपये कर भरतात मात्र तरीही त्यांना पुरेशा सुविधा मिळत नाही. परिसरातील अनेक पथदिवे बंदावस्थेत असून पुरेशे सीसीटीव्ही कॅमेरे देखील नाही. काही रस्त्यांची देखील दुरवस्था झालेली आहे.