उधना–पंढरपूर आषाढी स्पेशल रेल्वेचे जळगाव लोकसभेत जल्लोषात स्वागत; खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश

उधना–पंढरपूर आषाढी स्पेशल रेल्वेचे जळगाव लोकसभेत जल्लोषात स्वागत; खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश
जळगाव | प्रतिनिधी
पंढरपूर आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या उधना–पंढरपूर आषाढी स्पेशल रेल्वेचे जळगाव लोकसभा क्षेत्रातील विविध स्थानकांवर उत्साहात स्वागत करण्यात आले. या सेवेसाठी खासदार स्मिता वाघ यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. ४ जुलै २०२५ रोजी रेल्वेच्या पहिल्या फेरीचे अमळनेर, धरणगाव, जळगाव, पाचोरा आणि चाळीसगाव या स्थानकांवर हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत जल्लोषात स्वागत झाले.
खासदार स्मिता वाघ यांनी अमळनेर स्थानकापासून स्वतः रेल्वे प्रवास सुरू केला आणि प्रत्येक स्थानकावर उपस्थित राहून स्वहस्ते हिरवा झेंडा दाखवत रेल्वेला शुभेच्छा दिल्या. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “जय हरी विठ्ठल” च्या घोषणांनी वातावरण भक्तिमय झाले होते. काही ठिकाणी भजनी मंडळांनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी रेल्वे स्थानकांत वारीचा रंग चढला होता.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने ही विशेष सेवा सुरू झाली आहे. वयोवृद्ध, महिला, लहान मुले व युवकांसाठी सुरक्षित, आरामदायक आणि सुलभ प्रवासाची सोय झाल्यामुळे वारकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही सेवा जळगाव लोकसभा क्षेत्रातील पाच प्रमुख स्थानकांसोबतच दक्षिण गुजरातमधील सुरत, उधना, व्यारा तसेच पश्चिम खान्देशातील नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा येथील भाविकांसाठीही लाभदायक ठरत आहे. प्रवासादरम्यान खासदार स्मिता वाघ यांनी वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
वारीचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि भक्तिपूर्ण करणाऱ्या या उपक्रमाबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. “वारीचा मार्ग सुलभ करणाऱ्या या सेवेसाठी खासदार स्मिता वाघ यांचे मनःपूर्वक आभार,” अशा भावना अनेक भाविकांनी व्यक्त केल्या.