रोकडे येथे सरपंच निवडीवरून वाद ; सरपंच हिराबाई जाधव यांची तहसीलदारांकडे हरकत
चाळीसगाव : तालुक्यातील रोकडे येथील ग्रामपंचायतीत विद्यमान सरपंचांनी राजीनामा न देता नवीन सरपंच निवडीचा घाट घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात विद्यमान महिला सरपंच हिराबाई प्रभाकर जाधव यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन या निवड प्रक्रियेवर हरकत नोंदवली आहे.
हिराबाई जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्या रोकडे ग्रामपंचायतीच्या सरपंच असून ८ सप्टेंबर रोजी मंडळ अधिकाऱ्यांकडून सरपंच निवडीची नोटीस मिळाल्याने त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. मी अशिक्षित असूनही गत वर्षभरापासून सरपंच म्हणून समाधानकारक काम केले आहे.
गत वर्षभरापासून ग्रामपंचायतीत ग्रामसेवक नसल्याने पंचायत समितीकडे वारंवार विनंती करूनही त्यांची नियुक्ती झालेली नाही, त्यामुळे
ग्रामसभा किंवा मासिक बैठका घेता आल्या नाहीत. तसेच, माझ्या कामकाजाबाबत कुणाचीही तक्रार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तर मी माझ्या सरपंच पदाचा राजीनामा दिलेला नाही किंवा कोणत्याही पत्रावर स्वाक्षरी ही केलेली नाही, तर माझ्या सहिची पडताळणीही झालेली नाही.
त्यामुळे १२ सप्टेंबरला होणारी सरपंच निवड ही कायद्याला धरून नसून बेकायदेशीर आहे. त्यामुळे ही निवड प्रक्रिया तत्काळ स्थगित करून माझ्या कथित राजीनाम्याची पडताळणी करण्यासाठी बैठक घ्यावी, असे हिराबाई जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यांनी तहसीलदार यांच्यासह जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, मंडळाधिकारी व अध्यासी अधिकारी हातले यांनाही निवेदन दिले आहे. या प्रकारामुळे रोकडे गावात ग्रामपंचायतीच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.






