शेअर मार्केटच्या नावाखाली लाखोंचा गंडा, जळगाव सायबर टीमने दिल्लीत दोघांना पकडले

महा पोलीस न्यूज | २८ जून २०२४ | जळगाव शहरातील एकाला शेअर मार्केट प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली दिल्ली येथील काहींनी ६ लाखांचा गंडा घातला होता. जळगाव सायबर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला होता. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे दिल्लीतून दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोघांना जळगाव न्यायालयात हजर केले असता २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अधिक माहितीनुसार, जळगाव सायबर पोलिसात २७ एप्रिल २०२४ रोजी गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यात फिर्यादी हेमेन्द्र राजेंद्र शर्मा वय ५७ वर्षे, व्यवसाय व्यापार, रा.जयनगर फ्लॅट नं.४, गिताई व्हिला, ओंकारेश्वर मंदिराजवळ, जळगांव, जि. जळगांव हे आहेत. फिर्यादी यांना शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतवणुक करणे संदर्भात माहिती पाहिजे असल्याने त्यांनी फेसबुकवर राम इनव्हेस्टमेंट अॅकॅडमी नावाने एक जाहिरात बघितली त्यामध्ये ते इनव्हेस्टमेंट बाबत माहिती फ्रि ऑफ कॉस्टमध्ये देणार असल्याने तसेच क्लासमध्ये शेअर्स मार्केट संबधीत माहिती सांगत असल्याने त्यांनी फेसबुक वरील लिंकवर क्लीक केले असता, त्यांनी फिर्यादीला एका व्हॉटसअॅप गृपवर जॉईन केले. त्यात गृप अॅडमीनने व्हॉटसअॅप गृपला लिंक शेअर केली.
लिंकवर गेल्यावर त्यामध्ये शेअर मार्केट संबधीत क्लास घ्यायचे. डॉ.अशिंद शहा आणि गुरुराम हे क्लासचे कामे पाहत होते, व्हॉटसअॅप गृप वरुनच आम्ही लवकरच मुंबई येथे शेअर मार्केट संबधीत ऑफीस सुरु करणार आहोत त्यात किमान ५०० लोकांना यातुन काम देणार आहोत यासाठी त्यांनी वेगवेगळे कारण सांगुन प्रलोभन देत होते. त्यांनी ऑनलाईन क्लासमध्ये एक योजना सांगुन जो कोणी हा क्लास १० वेळा अटेन्ड करेल त्यास १००० रुपये देवु व २० वेळा अटेन्ड करेल तर त्यास मोबाईल देवु व ४० वेळा अटेन्ड करेल तर त्यास एक लॅपटॉप देवु अशा प्रकारे प्रलोभन दिले होते.
६ लाखांची केली फसवणूक
दि.८ फेब्रुवारी ते दि.८ एप्रिल पावेतो अनोळखी इसमांनी RAM INVESTMENT ACADEMY Z1 या नावाने व्हॉटसअॅपवर गृप तयार करुन त्याव्दारे फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन यांना शेअर्स खरेदी विक्रीचे प्रशिक्षण देवुन TECHSTAR नावाची अॅपमध्ये जॉईन करणेस सांगितले. फिर्यादी यांचे नावाने अकांउट तयार करण्यास सांगून फिर्यादी यांना वेगवेगळ्या कारणासांठी व चार्जेस नावाखाली एकूण ५ लाख ९५ हजार ७५० रुपयाची आर्थिक फसवणुक केलेली आहे. गुन्ह्यात फिर्यादी यांनी विविध बँक खात्यांवर रक्कम भरली आहे. याप्रकरणी गुन्ह्याचा तांत्रीक तपास करुन त्याद्वारे अधिक माहिती प्राप्त करुन आरोपीतांचा शोध घेवुन अटक करणे कामी पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांचे मार्गदर्शखाली तपास सुरु करण्यात आला होता.
दिल्लीतून घेतले दोघांना ताब्यात
सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम सायबर पो.स्टे यांनी हवालदार प्रदीप चौधरी, श्रीकांत चव्हाण, ललित नारखेडे, वसंत बेलदार यांचे सोबत प्रदिप नितीन भालेराव, प्रशांत साळी यांची टिम रवाना केली. पथकाने दोन दिवस दिल्लीत जावुन तांत्रिक माहितीवरुन सापळा रचुन मोठ्या शिताफीने पटेल नगर, दिल्ली या भागातुन रणजित सिंग मदन कुमार, वय-४३ रा.J ब्लॉक, जहांगीरपुर, दिल्ली व प्रविण कुमार बिरेंद्र शाही, वय- ४४ रा.अंबरहाय एक्सटेंशन, व्दारका, दक्षिण- दिल्ली यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातुन पीएनबी बँकेच्या कागदपत्रांमध्ये असलेला मोबाईल फोन, विविध बँकांचे एटीएम कार्ड असे ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
पोलिसांनी केले आवाहन
दोघांना हजारी येथील न्यायालयात ट्रान्झीट रिमांड मिळणेकामी हजर करुन त्यावरुन ट्रान्झीट रिमांड प्राप्त केला. पथक गुरुवारी जळगाव येथे पोहचले. दोघांना दि.२७ रोजी जळगांव येथील मुख्य न्यायदंडाधिकारी सो. जळगांव यांचे न्यायालयात हजर करुन पोलीस कस्टडी मागीतली असता न्यायालयाने त्यांना दि.२ जुलै पावेतो पोलीस कोठडी सुनावली आहे. तरी जळगाव पोलीसांमार्फत नागरीकांना आव्हान करण्यात येत आहे की, कुठल्याही अज्ञात व्यक्तीला फोनद्वारे स्वतःची व बँकेची वैयक्तीक माहीती सांगु नये. कुठल्याही अनोळखी व्यक्तीबरोबर ऑनलाईन व्यवहार करताना पुर्ण खात्री करुन करावे व शेअर ट्रेडींग संदर्भात कुठलेही व्यवहार करु नये.