कासोदा पोलिसांची धडक कारवाई, लाखोंचा गुटखा जप्त; एकास अटक

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील कासोदा पोलिसांनी गुटखा विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एक वाहन आणि मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि तंबाखू जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
सहा. पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांना गुप्त माहिती मिळाली होती की, कासोदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुटख्याची विक्री होत आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी पोउनि. धर्मराज पाटील, पोना. अकिल मुजावर, पोकॉ. समाधान तोंडे, पोकॉ. प्रशांत पगारे, पोकॉ. कुणाल देवरे आणि पोकॉ. योगेश पाटील यांच्या पथकाला कारवाईसाठी पाठवले.
नाकाबंदी करून पकडली कार
पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, गालापुर रोडवर खडके फाट्याजवळ नाकाबंदी केली. यावेळी एमएच.२४.व्ही.३३६१ क्रमांकाची मारुती इको कार थांबवून तपासणी केली असता, त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला आणि सुगंधित तंबाखू आढळून आला. पोलिसांनी ताबडतोब गाडी आणि त्यातील सर्व साहित्य जप्त केले. गाडी चालकाचे नाव विजय शिवाजी वारे (रा. कासोदा, ता. एरंडोल) असे असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
३ लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
अन्न सुरक्षा अधिकारी किशोर हिम्मतराव बाविस्कर यांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली. यात १,१०,४६० रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला, सुपारी आणि तंबाखू तसेच २,००,००० रुपये किमतीची इको कार असा एकूण ३,१०,४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी विजय वारे यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोउनि. धर्मराज पाटील हे करत आहेत.






