‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन, पोलीस अधिक्षकांची माहिती

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । शहरातील भास्कर मार्केट परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये मद्यधुंद पोलिसाने धिंगाणा घातल्याचा प्रकार रविवार दि.२५ रोजी सायंकाळी घडला होता. दरम्यान, घडलेल्या प्रकाराची पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दखल घेतली असून त्या कर्मचाऱ्याचे निलंबन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. संदीप धनगर नेमणूक मुक्ताईनगर पोलीस ठाणे असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मद्यधुंद पोलिसांनी हॉटेलबाहेर जोरदार राडा घातल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास भास्कर मार्केटसमोरील एका हॉटेलसमोर घडली होती. कार पार्कीगमधून बाहेर काढत असतांना तेथील दुचाकींना धक्का दिला, त्यानंतर भरधाव वेगाने जात असतांना काही अंतरावर एका सायकलस्वार मुलाला आणि पत्रकाराच्या दिशेने धडक देत तो पसार झाला होता. सुदैवाने सायकलस्वार मुलाला कुठलीही दुखापत झाली नाही.
वाद एकाचा दोघांनी त्याला आवरले
हॉटेल बाहेर वाद होत असल्याची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी देखील त्याठिकाणी धाव घेतली होती. पोलिसांनी माहिती घेतली असता संदीप धनगर नामक कर्मचारी हॉटेलमध्ये आणि बाहेर वाद घालत होता. इतर दोघे कर्मचारी त्याची समजूत काढत होते तर त्याला आवर घालत होते मात्र तरीही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
निलंबन करुन चौकशी लागणार
हॉटेलमध्ये बसलेले कर्मचारी बंदोबस्त आटोपून त्याठिकाणी बसलेले होते. वाद घालणारा कर्मचारी पोशाख घालून असल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणाची वैयक्तिक चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.