गावठी कट्ट्याने दहशत भोवली, शनिपेठ ‘डीबी’ने आवळल्या मुसक्या

महा पोलीस न्यूज | १९ फेब्रुवारी २०२४ | जळगाव शहरातील काशीबाई उखाजी कोल्हे शाळेच्या मागे गावठी पिस्तूल हातात घेऊन दहशत माजविणे एकाला.चांगलेच भोवले आहे. शनिपेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने त्याला ताब्यात घेत पिस्तूल हस्तगत केले आहे. ईश्वर रामा पारधी (२३, रा. धानोरा बुद्रुक, ता. जळगाव) असे संशयिताचे नाव असून त्याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काशीबाई उखाजी कोल्हे शाळेच्या पाठीमागील भागात ईश्वर पारधी हा तरुण हातात गावठी पिस्तूल घेऊन परिसरात दहशत पसरवत असल्याची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, हवालदार परिष जाधव, राहुल पाटील, राहुल घेटे, अनिल कांबळे यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने लागलीच परिसरात जाऊन पाहणी केली असता ईश्वर पारधी हा आरडओरड करून दहशत पसरवत होता.
पोलिसांना पाहताच ईश्वर पारधी याने पळ काढला मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. पथकाने त्याच्याकडून पाच हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल हस्तगत केले. याप्रकरणी पोकॉ राहुल पाटील यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने ईश्वर पारधी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास परिष जाधव करीत आहेत.