Crime

जळगावात ओला इलेक्ट्रिकच्या बॅटरी चोरणारी टोळी जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

जळगाव: शहरात ओला इलेक्ट्रिक सर्व्हिस सेंटरच्या समोरून दुचाकींच्या बॅटरी आणि MCU असेंबली चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

अजिंठा चौफुली परिसरातील ओला इलेक्ट्रिक सर्व्हिस सेंटरच्या समोरील मोकळ्या जागेतून ११ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरी आणि MCU असेंबली चोरून नेली होती. याप्रकरणी २० जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. ६०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२)) दाखल करण्यात आला होता.

अशी झाली कारवाई

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाची स्थापना केली. पथकाने घटनास्थळासह शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले:

१) अब्देअली शब्बीर नगरी (वय २८, रा. शिवाजीनगर, जळगाव)

२) साकीब खान इरफान खान सिकलगर (वय २२, रा. सालारनगर, जळगाव)

मुद्देमाल हस्तगत

पोलिसांनी दोन्ही आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीला गेलेली ५७,००० रुपये किमतीची ओला कंपनीची बॅटरी आणि MCU असेंबली जप्त करण्यात आली आहे.

तपास पथक

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि पोलीस उपअधीक्षक नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, गिरीश पाटील, निलेश पाटील, शशिकांत मराठे आणि रमाकांत साळुंखे यांच्या पथकाने केली. पुढील तपास गिरीश पाटील व निलेश पाटील करत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button