हनी ट्रॅपचे विदारक सत्य.. ५ पीडितांच्या आत्महत्या, शेकडो सेक्स व्हिडीओ!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । हनी ट्रॅप हा विषय काही नवीन राहिलेला नाही. देशात अनेक दिग्गज नेतेमंडळी ते प्रतिष्ठित नागरिकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात देखील सध्या एक हनी ट्रॅप चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिसी सूत्रांच्या माहितीनुसार हनी ट्रॅपच्या जाळ्यात आजवर ५ पीडित पुरुषांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे इतकेच काय तर महिलेच्या मोबाईलमध्ये शेकडो सेक्स व्हिडीओ क्लीप मिळाल्या आहेत. जळगावातील हजारो तरुण ते प्रौढ तिच्या संपर्कात आले होते आणि नियमीत ग्राहक म्हणून तिची भेट घेत होते. हनी ट्रॅप प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांच्या मनात भीतीने काहूर उठले आहे मात्र पिडीतांनी समोर आल्यास अशा प्रवृत्तीला लगाम घालणे शक्य होणार आहे.
देशात अनेक हनी ट्रॅप प्रचंड गाजले आहेत. हनी ट्रॅप प्रकरणात अनेक मोठमोठे नेते अडकले तर अनेक प्रतिष्ठित नागरिकांना देखील बदनाम करण्यात आले. जळगाव शहरात देखील एक हनी ट्रॅप प्रकरण गाजत आहे. हनी ट्रॅप प्रकरणात पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असली तरी संबंधित महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच आज सावध होणे गरजेचे आहे.
फसवणुकीची अनोखी पद्धत
जळगावातील हनी ट्रॅप प्रकरणातील महिलेची सावज हेरण्याची निराळी पद्धत होती. जळगावात आपल्या जुन्या ग्राहकांच्या माध्यमातून आणि सोशल मीडियातून संपर्कात आलेल्यांशी ओळखी वाढविणे, शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि त्यांचा मोबाईल क्रमांक आपल्याकडे सेव्ह करणे असा तिचा फंडा होता. सोशल मीडियातून फोटो, व्हिडीओ पाठविणे आणि पुढे कॉलवर बोलणे करून त्याचे रेकॉर्डिंग करणे अशी त्या महिलेची पद्धत होती.
मोबाईलमध्ये सापडले शेकडो व्हिडीओ
पोलीस तपासात महिलेचा मोबाईल पोलिसांनी तपासाला असता त्यात शेकडो सेक्स व्हिडीओ आढळून आले आहेत. इतकेच नव्हे तर व्हिडीओ कॉलच्या रेकॉर्डिग आणि व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग देखील पोलिसांना मिळून आल्या आहेत. महिलेच्या संपर्कातील नागरिकांची पोलिसांकडून पडताळणी सुरु आहे.
व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल
संपर्कातील नागरिकांपैकी शासकीय सेवक, नोकरदार, उद्योजक, बडे व्यापारी, पोलीस यांना ती महिला हेरत होती. नियमित पैसे घेण्यापेक्षा ती थेट महिन्याचे पैसे ठरवून घेत होती. त्यानंतर आपल्या कौटुंबिक अडचणी सांगून किंवा काही ना काही कारण सांगत समोरच्या व्यक्तीकडून ती पैसे उकळत होती. इतके करून देखील समोरचा पैसे देत नसल्यास थेट रेकॉर्डिगची धमकी देत त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून लाखो रुपये मागत होती.
५ पीडितांच्या आत्महत्या?
पोलिसी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या संपर्कात असलेला एक व्यक्ती तिच्यासाठी दलाल म्हणून काम करीत होता. सावज हेरायचे आणि ते तिच्यापर्यंत पोहचविण्याचे काम तो करीत होता. तसेच आणखी एक बडा मासा देखील महिलेला सावज शोधून देत असल्याची माहिती समोर येत आहे. महिलेच्या जाचाला कंटाळून आजवर ५ जणांनी आत्महत्त्या केल्याची माहिती समोर आली असून फसवणूक झालेल्यांचा पोलीस शोध घेत आहे.