
पंढरपूरमध्ये गिरीश महाजन यांची १७ तासांची अविरत सेवा : गर्दी व्यवस्थापनात दिला नवा आदर्श
पंढरपूर : प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या पावन भूमीत राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी आपल्या कार्यकर्तृत्वाचा नवा अध्याय लिहिला. ५ जुलैच्या मध्यरात्रीपासून ६ जुलैच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत सलग १७ तास त्यांनी कोणतीही विश्रांती न घेता गर्दी व्यवस्थापनाचे काम हाती घेतले.
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर महाद्वार परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. या परिस्थितीत सकाळी साडेपाच वाजता गिरीश महाजन स्वतः महाद्वार परिसरातील देखरेख टॉवरवर चढले आणि सायंकाळपर्यंत तेथेच राहून क्राउड मॅनेजमेंटची जबाबदारी सांभाळली.
यावेळी त्यांनी वॉकी-टॉकीच्या माध्यमातून पोलीस व आपत्कालीन यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधला. गरज भासल्यास त्यांनी स्वतः मैदानात उतरून वारकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले. ऊन्हा-पावसाची तमा न बाळगता त्यांनी अखंड सेवा दिली.
त्यांच्या या समर्पित सेवेस वारकरी, पोलीस कर्मचारी, स्वयंसेवक आणि प्रशासनाच्या वतीने भरभरून दाद देण्यात आली. अनेक भाविकांनी टॉवरकडे पाहून हात जोडले आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
गिरीश महाजन यांनी यानिमित्त केवळ मंत्री म्हणून नव्हे, तर खऱ्या अर्थाने सेवक म्हणून आपली भूमिका बजावली असून, त्यांच्या या कार्यातून पुढील पिढीसाठी सेवा वृत्तीचा आदर्श निर्माण झाला आहे.