जळगावात जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी लाच घेताना अटक

दहा हजारांची लाचेची मागणी; पाच हजार स्वीकारताना एसीबीची यशस्वी कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागातील कार्यरत अधिकारी श्रीमती माधुरी भागवत (वय ३८, रा. पिंप्राळा) यांना पगार बिलावर सह्या करण्याच्या मोबदल्यात लाच घेताना अँन्टी करप्शन ब्युरो (एसीबी)च्या पथकाने रंगेहाथ अटक केली. त्यांनी एकूण १० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ५ हजार रुपये स्वीकारताना त्यांच्यावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
पगार बिलावर सह्या करण्यासाठी मागितली लाच
तक्रारदार हे शासकीय दिव्यांग समिश्र केंद्र, जळगाव येथे प्रभारी अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या जून महिन्याच्या पगार बिलासंबंधी दि. १४ जुलै रोजी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयात भेट दिली. त्यावेळी अधिकारी माधुरी भागवत यांनी कोणतीही त्रुटी नसलेल्या बिलावर सह्या करण्यासाठी १२ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर रक्कम १० हजार रुपयांवर आली आणि त्यातील ५ हजार रुपये पहिल्या हप्त्यात मागण्यात आले.
तक्रारीवरून सापळा रचून कारवाई
तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत एसीबी कार्यालय, जळगाव येथे दिनांक २२ जुलै रोजी तक्रार दाखल केली. पडताळणीअंती तक्रार खरी आढळून आल्याने दिनांक २४ जुलै रोजी सापळा कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी माधुरी भागवत यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडून ५ हजार रुपये लाच स्वीकारली. त्यानंतर त्यांना त्वरित अटक करण्यात आली.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या कारवाईनंतर आरोपी विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर सापळा कारवाई पोलिस उप अधीक्षक श्री. योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पथकात जीपीएसआय सुरेश पाटील (चालक), पोहेकाँ शैला धनगर, पोकाँ प्रणेश ठाकूर व पोकाँ सचिन चाटे यांचा समावेश होता.
मोठ्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले
या कारवाईसाठी अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. भारत तांगडे व अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
नागरिकांसाठी एसीबीचे आवाहन
अँन्टी करप्शन ब्युरोकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणतेही शासकीय काम करून घेण्यासाठी कोणी लाच मागत असल्यास तत्काळ एसीबी कार्यालय, जळगाव येथे संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक :
📞 ०२५७-२२३५४७७
📞 टोल फ्री : १०६४