
बेटावद मॉबलिंचिंग प्रकरण : मुख्य आरोपी अजूनही मोकाट, एकता संघटनेचे अजित दादांकडे साकडे
जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे घडलेल्या मॉबलिंचिंग प्रकरणाला सहा दिवस उलटले असतानाही या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारावर कारवाई झालेली नाही. काही आरोपींना अटक करण्यात आली असली तरी स्थानिक राजकीय नेत्याचा निकटवर्तीय व एका संघटनेशी संलग्न मुख्य आरोपीला पोलिसांनी अद्याप अटक न केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
साक्षीदारांचे जबाब, उपलब्ध पुरावे आणि पीडितांच्या तक्रारी असूनही या आरोपीवर कारवाई टाळली जात असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. याशिवाय भारतीय दंड संहिता कलम ६१(२) सह मकोका लागू करण्याची टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास आणले आहे.
या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा एकता संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची जळगाव येथे भेट घेऊन तक्रार अर्ज सादर केला. यात तपासी अधिकारी बदलणे, मुख्य सूत्रधाराची अटक, मकोका लागू करणे, पीडित कुटुंबास संरक्षण व मदत, २५ लाख रुपयांची आर्थिक सहाय्य आणि सरकारी नोकरी, तसेच खटला जलदगतीने चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील नेमण्याची मागणी करण्यात आली आहे.
या घटनेमुळे अल्पसंख्याक समाजात भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून शासनाने तातडीने कारवाई करावी, अशी संघटनेची मागणी आहे.
अजित दादांचे आश्वासन
अजित पवार यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करताना, प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच राज्य पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याशी बोलून तक्रारीवरील मुद्द्यांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. ही घटना महाराष्ट्राला काळिमा फासणारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिष्टमंडळातील उपस्थित
मुफ्ती खालिद, फारूक शेख, नदीम मलिक, फिरोज शेख, कासिम उमर, जामनेरचे जावेद मुल्ला, आसिफ शेख, शाहबाज खान, शकील शेख, हाफिज रहीम पटेल, मौलाना कासिम नदवी, मौलाना गुफरान, मतीन पटेल, अनवर शिकलगर, एड. आवेश शेख, नजमुद्दीन शेख, साबिर खान, शब्बीर खान, अमजद पिंजारी, शेख फिरोज तसेच धुळे, नंदुरबार व जळगाव येथील राष्ट्रवादी पदाधिकारी या शिष्टमंडळात सहभागी होते.






