
महा पोलीस न्यूज । अमळनेर । पंकज शेटे । अमळनेर पोलिसांनी शुक्रवार दि.५ जुलै रोजी एका व्यक्तीला अवैध दारूची वाहतूक करताना अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे ४३ हजार २५५ रुपये किमतीची दारू आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. दुचाकीवरून अवैधरित्या दारू वाहतूक करीत असताना पोलिसांनी त्याला गुप माहितीच्या आधारे सापळा रचून अटक केली आहे. याप्रकरणी दुचाकी चालकासह वाईन शॉप मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचारी हितेश प्रकाश बेहरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, डीवायएसपी विनायक कोते गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, निलेश अशोक पाटील (वय २५, रा. जानवे, ता अमळनेर) हा एन. एस. टिल्लुमल वाईन शॉप, सुभाष चौक येथून देशी-विदेशी दारूच्या बाटल्या बेकायदेशीरपणे, विना परवाना विक्री करण्याच्या उद्देशाने दुचाकीवरून जानवे येथे घेऊन जात आहे. माहिती मिळताच त्यांनी पोलीस नाईक प्रमोद बागडे, हितेश बेहरे, गणेश पाटील, शेखर साळुंखे यांना रवाना केले.
या माहितीच्या आधारे, पोलीस पथकाने धुळे रोडवरील एच. पी. गॅस गोडाऊनसमोर सापळा रचला. सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास, अमळनेर शहराकडून एक दुचाकीस्वार एमएच-१९-सीएच-६३६५ या दुचाकीवरून चार कापडी पिशव्या घेऊन येताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला असता, तो थांबला. विचारपूस केली असता, त्याने पिशव्यांमध्ये दारूच्या बाटल्या असल्याचे सांगितले. त्याने ही दारू अमळनेर शहरातील सुभाष चौकातील एन. एस. टिल्लुमल वाईन शॉपमधून घेतल्याचे कबूल केले. त्याच्याकडे दारू वाहतुकीचा किंवा विक्रीचा कोणताही परवाना नव्हता, तसेच दारू खरेदीचे बिलही नव्हते.
पोलिसांनी निलेश अशोक पाटील (वय २५, रा.जानवे, ता.अमळनेर, जि.जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून विविध प्रकारची देशी-विदेशी दारू आणि हिरो डिलक्स कंपनीची दुचाकी क्रमांक एमएच.१९.सीएच.६३६५ असा एकूण ४३ हजार २५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या दारूमध्ये संत्रा, टँगो पंच देशी दारू, मॅकडोवेल नं. १ व्हिस्की, इम्पेरिअल ब्लू व्हिस्की, आयकॉनिक व्हाईट व्हिस्की, ऑफिसर चॉईस ब्लू व्हिस्की, ऑफिसर चॉईस व्हिस्की, गोवा जिन, हायवर्ड २००० बिअर आणि किंगफिशर बिअर यांचा समावेश आहे.
या प्रकरणी निलेश अशोक पाटील आणि एन. एस. टिल्लुमल वाईन शॉपच्या मालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(३७) सह भारतीय न्याय संहिता कलम ४९ प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.