अमळनेरमध्ये नागरिकांचा संताप; बोरसे गल्लीत गुडघ्यापर्यंत साचले पाणी

अमळनेरमध्ये नागरिकांचा संताप; बोरसे गल्लीत गुडघ्यापर्यंत साचले पाणी
अमळनेर पंकज शेटे I शहरातील बोरसे गल्लीतील मंगला देवी चौकात दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाचे पाणी गुडघ्यापर्यंत साचल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ही समस्या कायम असून, नगरपालिका प्रशासन यावर कोणताही तोडगा काढत नसल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बोरसे गल्ली परिसरात थोडा जरी पाऊस झाला तरी मंगला देवी चौकात पाणी साचते. यामुळे रहिवाशांची मोठी गैरसोय होत असून, गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना ये-जा करणे अवघड झाले आहे.
स्थानिक रहिवाशांनी या समस्येबद्दल नगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला आहे, मात्र प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला या समस्येची तात्काळ दखल घेण्याचे आवाहन केले आहे. जर यावर लवकरच उपाययोजना केली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला आहे






