
भुसावळ: तहसील कार्यालयातील निवडणूक स्ट्राँगरूममधील जुन्या पत्रांच्या विक्रीत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी केला आहे. त्यांनी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सानप यांनी निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी स्ट्राँगरूममधील निवडणूक साहित्याची पत्रे बदलण्यात आली. नवीन पत्रे ठेवून जुन्या पत्रांना कार्यालयाच्या आवारातच ठेवण्यात आले. मात्र, या जुन्या पत्रांच्या विक्रीसाठी तहसील कार्यालयाने कोणतीही निविदा किंवा लिलाव प्रक्रिया राबवली नाही.
तहसील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने नियम धाब्यावर बसवत ही पत्रे परस्पर विक्रीस काढल्याची गोपनीय माहिती समोर आली आहे.या गैरप्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सानप यांनी केली आहे.
तसेच, या कारवाईची एक प्रत माहितीस्तव उपलब्ध करून देण्याची विनंतीही त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना केली आहे. या तक्रारीमुळे तहसील कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासन या प्रकरणाचा किती गांभीर्याने तपास करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.