जळगाव मनपा निवडणूक: महायुतीचा विजयाचा चौकार; शिवसेना शिंदे गटाची घोडदौड कायम

जळगाव मनपा निवडणूक: महायुतीचा विजयाचा चौकार; शिवसेना शिंदे गटाची घोडदौड कायम
प्रभाग ९ ‘ब’ मधून प्रतिभा देशमुख बिनविरोध; सलग तिसऱ्या विजयाने शिवसेनेत जल्लोष
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि महायुतीची विजयाची मालिका अधिक गडद होत चालली आहे. डॉ. गौरव सोनवणे आणि मनोज चौधरी यांच्या निवडीनंतर आता प्रभाग ९ ‘ब’ मधून शिवसेनेच्या प्रतिभा देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यामुळे महापालिकेत महायुतीचा चौथा, तर शिवसेना शिंदे गटाचा सलग तिसरा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात महायुतीचे वर्चस्व अधिक ठळक झाले आहे.
या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मुसंडी मारली आहे. प्रभाग क्रमांक १८ ‘अ’ (अनुसूचित जमाती राखीव) मधून आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ. गौरव सोनवणे यांची बिनविरोध निवड आधीच निश्चित झाली होती. या ठिकाणी उद्धवसेनेचे उमेदवार मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी माघार घेतल्याने गौरव सोनवणे यांचा विजय सोपा झाला. त्यानंतर प्रभाग ९ ‘अ’ मध्येही शिवसेनेच्या मनोज सुरेश चौधरी यांच्या विरोधातील एकमेव अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली.
विजयाची ही घोडदौड सुरूच असताना दुपारी प्रभाग ९ ‘ब’ मधील चित्रही स्पष्ट झाले. येथील अपक्ष उमेदवार प्रतिभा पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेनेच्या प्रतिभा देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. सलग तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून, महापालिकेत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
दरम्यान, महायुतीमधील भारतीय जनता पक्षानेही आपले खाते आधीच उघडले आहे. भाजपच्या माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला मोहन बेंडाळे यांची प्रभाग १२ ‘ब’ मधून बिनविरोध निवड झाली आहे. अशाप्रकारे आतापर्यंत महायुतीचे एकूण चार शिलेदार निवडणुकीच्या रिंगणाबाहेरच विजयी ठरले असून, यामुळे आगामी प्रत्यक्ष मतदानापूर्वीच महायुतीने मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.






