साश्रू नयनांनी वीर जवानाला अखेरचा निरोप, शहीद स्वप्नील सोनवणे अनंतात विलीन

महा पोलीस न्यूज । विजय माळी । भडगाव येथील सुपुत्र आणि भारतीय सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) ५७ बटालियन जी.डी. कॉन्स्टेबल जवान स्वप्नील सुभाष सोनवणे (पाटील), वय ३९, यांना देशसेवेत असताना वीरमरण आले. भारत-बांगलादेश सीमेवरील पश्चिम बंगाल येथे ते सेवा बजावत असताना, रक्षा बंधनाच्या दिवशीच (९ ऑगस्ट) रात्री ८:३० वाजता विजेचा धक्का बसून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. ही हृदयद्रावक बातमी गावात पोहोचताच संपूर्ण कुटुंब आणि गाव शोकाकुल झाले. तीन दिवस गावात सार्वजनिक दुखवटा पाळण्यात आला. अखेर १२ ऑगस्ट रोजी त्यांचे पार्थिव मूळ गावी आणण्यात आले आणि साश्रू नयनांनी हजारोंनी त्यांना अखेरचा निरोप दिला. शहीद जवान स्वप्नील सोनवणे आता अनंतात विलीन झाले आहेत, पण त्यांचे बलिदान देशवासीयांच्या स्मृतीत कायम राहील.
स्वप्नील सोनवणे हे गेल्या ११ वर्षांपासून देशाच्या विविध भागांत सेवा बजावत होते. त्यांची देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठा सर्वांसाठी प्रेरणादायी होती. पश्चिम बंगाल येथे सीमेवर ते ड्यूटीवर असताना हा अपघात घडला. बातमी येताच गावात शोककळा पसरली. कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी तीन दिवस दुखवटा पाळला. शहीदांच्या पार्थिवाचे आगमन होण्यापूर्वी गावातील प्रत्येक घरात शोकाचे वातावरण होते.
१२ ऑगस्ट रोजी सकाळी विशेष विमानाने कलकत्ता, मुंबई आणि इंदोर मार्गे त्यांचे पार्थिव विशेष सैनिक वाहनाने भडगाव येथे आणण्यात आले. कळमळू, जामदा, भवाळी आणि बहाळ मार्गे येत असताना रस्त्यावर स्वयंस्फूर्तीने मिरवणूक काढण्यात आली. लोकांनी पुष्पवृष्टी करून शहीदांना अभिवादन केले. सकाळी १० वाजता पार्थिव मूळ गावातील घरी पोहोचले. यावेळी पत्नी कविता, मुलगा रूद्राक्ष, मुलगी योगेश्वरी, आई कल्पना, बहिणी, परिवारातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि ग्रामस्थांनी मुखदर्शन घेतले. या क्षणी उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. मोठा हंबरडा फुटला आणि अनेकांना अश्रू अनावर झाले. घरात आरती करण्यात आली आणि शहीदांच्या स्मृतीला वंदन करण्यात आले.
घरापासून अंत्ययात्रा सुरू झाली. तिरंगा ध्वज, फुगे, पताका आणि फुलांनी सजविलेल्या वाहनावरून पार्थिव गावातील मुख्य गल्लीतून काढण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्यांनी अंगणे आणि चौक सजविले गेले होते. गावात चौका-चौकात श्रद्धांजली बॅनर लावण्यात आले होते. “भारत माता की जय”, “शहीद जवान स्वप्नील सोनवणे अमर रहे” अशा घोषणांनी संपूर्ण गाव दणाणून गेले. अंत्ययात्रेत गावातील आणि परिसरातील मोठ्या संख्येने महिला, पुरुष, तरुण आणि शाळकरी मुले सहभागी झाले. सुमारे एक किलोमीटरपर्यंत ही मिरवणूक निघाली. अग्रभागी पाच बॅंड पथकांवर देशभक्तीपर गीते गायली जात होती. पार्थिवावर आणि रॅलीत पुष्पवृष्टी करण्यात येत होती.
नानासाहेब कृ. दे. पाटील स. मा. विद्यालयातील विद्यार्थी आणि आयुष करिअर ॲकेडमी जळगाव यांनी २०० मीटर लांबीची तिरंगा रॅली काढली. यात परिसरातील शेकडो तरुण सहभागी झाले. गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील गुढे फाट्यावर मोकळ्या जागेवर अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. गावातील तरुण आणि माजी सैनिकांनी यासाठी नियोजन आणि परिश्रम घेतले.
अंत्यसंस्कारापूर्वी वीर माता, पत्नी आणि परिवारातील सदस्यांनी पुष्पचक्र वाहिले. भडगाव, चाळीसगाव, पाचोरा आदी जिल्ह्यांतून सुट्टीवर आलेले सैनिक आणि माजी सैनिकांनीही अभिवादन केले. सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शहीद सागर पाटील आणि राहुल माळी यांच्या परिवारासह शासनाच्या वतीने तहसीलदार शितल सोलाट, पोलिस उपनिरीक्षक सुशीलकुमार सोनवणे, पो. हे. कॉ. विजय जाधव, पो. कॉ. प्रवीण परदेशी, निलेश ब्राह्मणकर, नायब तहसीलदार सुधीर सोनवणे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, ५७ बटालियनचे इन्स्पेक्टर कमल किशोर आणि तुकडीतील ९ सैनिक यांनी पुष्पचक्र अर्पण केले. विविध राजकीय पक्ष, संस्था आणि संघटनांच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनीही श्रद्धांजली वाहिली.
यानंतर महाराष्ट्र पोलिस जळगाव मुख्यालयातील हेड कॉन्स्टेबल संतोष सुरवाडे यांच्या नेतृत्वात ११ पोलिस कर्मचारी आणि ५७ बीएसएफचे इन्स्पेक्टर कमल किशोर यांच्या नेतृत्वात ९ जवानांच्या तुकडीने मानवंदना दिली. बिगुल वाजवून तीन-तीन पायरी देऊन सलामी देण्यात आली. बीएसएफ आणि प्रशासनाच्या वतीने शहीद जवानांच्या माता, पत्नी, रूद्राक्ष आणि योगेश्वरी यांच्याकडे तिरंगा ध्वज सुपूर्द करण्यात आला. अखेर रूद्राक्ष आणि योगेश्वरी यांनी वडिलांना अग्नीडाग देत अखेरचा निरोप दिला. या क्षणी वातावरण पूर्णपणे सुन्न झाले आणि उपस्थित सर्वांना अश्रू अनावर झाले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, पहाटेपासून गुढे गावात नातेवाईक, मित्र, परिवार आणि ग्रामस्थांची गर्दी जमू लागली होती. पार्थिव गावात दाखल होताच कुटुंबासह गावकऱ्यांचा अश्रूंचा बांध फुटला. स्वप्नीलच्या नव्या घरी पार्थिव आल्यानंतर पत्नी कविता, आई कल्पना, बहिणी, चुलत भाऊ माजी सैनिक शशीकांत सोनवणे, एसएसबीचे जवान जयवंत सोनवणे आणि लहान मुले रूद्राक्ष व योगेश्वरी यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. हा आक्रोश ऐकून उपस्थित प्रत्येकाच्या मनात देशसेवकांच्या बलिदानाची जाणीव अधिक गडद झाली.
शहीद स्वप्नील सोनवणे यांच्या बलिदानाने भडगाव आणि परिसरात देशभक्तीची नवी लहर निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. देशाच्या सीमेवर प्राणार्पण करणाऱ्या अशा वीर जवानांना आमचा सलाम!






