तरुणाचा तेल्हारा येथे अपघाती मृत्यू; ‘ऑन ड्युटी’ असताना थारने दिली जोरदार धडक

तरुणाचा तेल्हारा येथे अपघाती मृत्यू; ‘ऑन ड्युटी’ असताना थारने दिली जोरदार धडक
सुकळी गावातील एकुलत्या एका मुलाच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर; चिमुकलीने गमावले पितृछत्र
मुक्ताईनगर (प्रतिनिधी): कर्तव्यावर असताना अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तेल्हारा (जि. अकोला) येथे भारत फायनान्स कंपनीत कार्यरत असलेले भागवत वसंत सोनवणे (वय ३२) यांचा ४ जानेवारी रोजी अकोला येथील रुग्णालयात मृत्यू झाला. एका भरधाव थार जीपने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला होता.
मिळालेली माहिती अशी की, भागवत सोनवणे हे तेल्हारा येथील भारत फायनान्स प्रा. लि. कंपनीत ब्रँच मॅनेजर म्हणून काम पाहत होते. २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास महिलांची नियोजित बैठक आटोपून ते आपल्या दुचाकीने कार्यालयाकडे परतत होते. याच दरम्यान समोरून येणाऱ्या भरधाव महिंद्रा थार कारने (क्रमांक TS 07 HW 6677) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत भागवत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते जागीच बेशुद्ध पडले.
अपघातानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने तेल्हारा येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर ४ जानेवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
याप्रकरणी मयताचे सासरे निवृत्ती भाऊराव गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी थार कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तायडे करत आहेत.
भागवत सोनवणे हे वसंत सोनवणे यांचे एकुलते एक पुत्र आणि कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि अवघ्या नऊ महिन्यांची चिमुकली मुलगी असा परिवार आहे. एकुलत्या मुलाच्या अपघाती निधनामुळे सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज सुकळी (ता. मुक्ताईनगर) येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.






