तेली समाजाच्या एकतेसाठी जळगावात महासभा उत्साहात पार
प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत समाजहिताच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा; राज्य परिषद जाहीर

अमळनेर |पंकज शेटे – महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव जिल्हा शाखेच्यावतीने आयोजित तेली समाजाची भव्य महासभा रविवारी (दि. २७ जुलै) दुपारी १२ वाजता स्टार पॅलेस हॉटेल, नवीन बस स्टँड, जळगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाची सुरुवात संत जगनाडे महाराज यांच्या मूर्तीला माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चौधरी यांनी स्वागतपर भाषणात समाजातील युवकांनी संघटनेच्या कार्यात पुढे यावे, असे आवाहन केले. प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी आपल्या भाषणात समाजातील एकतेचे महत्व अधोरेखित करत, “विकासासाठी सर्व घटकांनी एकत्र येणे काळाची गरज आहे,” असे ठामपणे सांगितले.
या बैठकीत जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील तालुकाध्यक्षांनी समाजहिताच्या अनेक नवकल्पना सादर केल्या. त्यामध्ये साखरपुडा व समारंभांतील कपडे देवाण-घेवाण थांबविणे, ही जुनी प्रथा बंद करणे या प्रस्तावास विशेष प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वाचनालय अथवा पुस्तक मदत केंद्र सुरू करणे, शेतकऱ्यांना बियाणे व खतांसाठी सहाय्य, तसेच वैद्यकीय व कायदेशीर अडचणींवर मार्गदर्शन देणारे समिती व वकिलांचे पथक स्थापन करणे यासारख्या उपयुक्त उपक्रमांवर चर्चा झाली. प्रत्येक तालुक्यात तंटामुक्ती समित्या स्थापन कराव्यात, या प्रस्तावालाही एकमताने सहमती दर्शविण्यात आली.
महासभेत संघटनात्मक रचना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. यासाठी प्रत्येक तालुक्यात महिला प्रदेश संघ, युवक व युवती संघ, डॉक्टर-वकील संघ तसेच आजी-माजी अधिकारी संघ स्थापन करण्याचे आदेश प्रदेश पातळीवरून देण्यात आले. या उपघटकांमार्फत समाजात संवाद, सहकार्य आणि सेवा देण्याची प्रक्रिया गतिमान होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीला जिल्हा तसेच तालुका पातळीवरील पंचमंडळ, महासंघ पदाधिकारी, समाजबांधव मोठ्या संख्येने—सुमारे ५०० जण—उपस्थित होते. समाजातील नवचैतन्य जागवण्यासाठी भविष्यात राज्य परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ही परिषद समाजाच्या नवसंघटनेच्या दिशेने महत्वाची पावले उचलेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांचा विजय चौधरी व दत्तात्रय चौधरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांमध्ये उपाध्यक्ष विनोद चौधरी, अॅड. वसंत भोलाणे, सेवा आघाडी प्रदेशाध्यक्ष बी. एम. चौधरी, नंदू चौधरी, सीताराम देवरे, अशोक चौधरी, प्रशांत शिंदे, प्रशांत सुरळकर, शामकांत चौधरी यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल रामदास चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक चौधरी यांनी मानले. या यशस्वी आयोजनासाठी महासंघाचे पदाधिकारी व नवयुवक मंडळाचे कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली.