ब्रेकिंग : पोलिसांना चकमा देणारा आरोपी पुन्हा जाळ्यात
महा पोलीस न्यूज | १३ जून २०२४ | जळगाव शहरात एका भंगार विक्रेत्याला मारहाण करून तीन हजार रुपये हिसकावून नेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शनिपेठ पोलिसांनी भोलासिंग जगदीशसिंग बावरी (३२, रा.तांबापुरा) याला न्यायालयात हजर केले होते. बुधवारी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र त्यानंतर त्याने परिसरातून पोलिसांची नजर चुकवून पळ काढला होता. पोलिसांनी संपुर्ण शहर पिंजून काढत पहाटेच्या सुमारास एमआयडीसी भागातून अटक केली.
जळगाव शहरात अनेक गुन्हे दाखल असलेला अट्टल गुन्हेगार भोलासिंग जगदीशसिंग बावरी (३२, रा.तांबापुरा) याने दि.११ जून रोजी भंगार विक्रेत्याला मारहाण करून तीन हजार रुपये काढून तो पसार झाला होता. याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल होताच शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोउनि मुबारक तडवी, पोकॉ राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे यांनी त्याला अटक केले होते.
बुधवार दि.१२ जून रोजी दुपारी शनिपेठ पोलिसांनी भोलासिंग बावरी याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्याला बाहेर आणण्यात आले असता त्याने पोलिसांची नजर चुकवत पळ काढला. पोलिसांनी त्याचा लागलीच शोध सुरू केला मात्र तो मिळून आला नाही.
शनिपेठ पोलीस ठाण्याचे डीबी पथक आणि इतर कर्मचारी भोलासिंग बावरी याचा शोध घेत होते. बावरी याच्याकडे पैसे, कपडे, मोबाईल काहीच नसल्याने त्याचा अंदाज बांधणे कठीण होते. अखेर गुरुवारी पहाटेच्या सुमारास एमआयडीसी परिसरातून गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. भोलासिंग बावरी याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.