रेमंड बडतर्फ कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री महाजन, आ.भोळेंवर जोरदार टीका
महा पोलीस न्यूज । २५ जुलै २०२४ । जळगाव शहरातील रेमंड कंपनीतील काही कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले असून दुसऱ्या दिवशी काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी भेट देत पाठिंबा दिला. कामगारांसोबत राजकारण खेळले जात असल्याचा आरोप करीत दोघींनी नेत्यांवर निशाणा साधला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या की, ज्या कामगारांना कंपनीतून ज्या कारणाने काढण्यात आलेले आहे तसेच त्यांच्यावरती जे आक्षेप घेण्यात आलेले आहेत त्यामुळे आज त्यांना दुसरीकडे कुठेही रोजगाराची संधी मिळत नाहीये आणि रोजगार मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आज त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा करायचा अशी प्रत्येकाची अडचण आहे. आज प्रशासनाला त्यांच्यामार्फत आम्ही देखील विनंती करतो आहे की, या सगळ्या कर्मचाऱ्यांनी गेले अनेक वर्ष रेमंडमध्ये चांगली सेवा बजावलेली आहे. कंपनीमध्ये कंपनी वाढवण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान राहिलेलले आहे आणि त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. कोणत्याही राजकीय द्वेषापोटी या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येऊ नये, अशी विनंती त्यांनी केली.
तसेच राजकीय हस्तक्षेप करून काही लोकांवर अन्याय करण्यात येतोय आणि काही वैयक्तिक स्वतःचा फायदा करून घेण्यासाठीचे काम करीत आहे. इथे दीडशे कर्मचाऱ्यांची नव्याने भरती करण्यात आलेली आहे. न्याय हा प्रत्येकाला दिला गेला पाहिजे काही कर्मचाऱ्यांना काढून त्यांच्यावरती अन्याय करणं हे चुकीच आहे. शेवटी त्यांनाही परिवार आहेत त्यांनीही अनेक वर्ष या कंपनीमध्ये सेवा दिलेली आहे. आज जे काय कंपनी टिकून आहे किंवा जी वाढली आहे ती या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीनेच वाढली आहे. त्यामुळे त्यांचा सहानुभूतीपूर्वक देखील विचार केला पाहिजे. कुणाला नोकरी लावली तर त्यांच्या पोटावर लाथ मारण्यासाठी आम्ही म्हणणार नाही. त्यांनी त्यांचे राहावे पण या कर्मचाऱ्यांवरती अन्याय करू नये यांना यांचा हक्क मिळावा, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली.
काँग्रेसच्या नेत्या आणि लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रमुख प्रतिभा शिंदे म्हणाल्या की, जळगाव शहर तसं महाराष्ट्राचा मध्यवर्ती शहर आहे पण दुर्दैवाने शहरामध्ये एमआयडीसीमध्ये मोठे मोठे प्रकल्प आलेले नाही. रेमंड हे इथे आहे आणि अनेक कामगारांना रोजगार देणारे असे माध्यम आहे. या माध्यमातून अनेक लोक वर्षानुवर्ष कामगार म्हणून येथे नोकरी करतात. पंधरा-पंधरा वर्षे सेवाभावी नोकरी करत असताना त्यांच्यामध्ये दहा वर्षांपूर्वी सत्तेची चटक लागलेले काही लोक राजकारण करत इथल्या कर्मचाऱ्यांच्या वरती ज्या पद्धतीने राजकारण करून त्यांना काढण्याचे षडयंत्र करतात त्याचा आम्ही निषेध करतो. गिरीश महाजन तुम्हाला अनेक कारणाने चुकून का होईना जिल्ह्याचे नेतृत्व मिळालेला आहे, ते नेतृत्व तुम्ही अशा पद्धतीने छोटे होऊन राजकारण करून कामगारांच्या पोटावर उठून जर करणार असाल तर हा कामगार संघटित होईल एकत्र होईल आणि तुमच्या सत्तेच्या जीवावर उठल्याशिवाय राहणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, कामगारांच्या बरोबर राजकारण करू नका, अशी टीका त्यांनी केली.
आ.सुरेश भोळेंवर टीका करत, राजूमामा भोळे खरे म्हणजे ते सुरेश भोळे आहेत, सगळे त्यांना राजूमामा म्हणतात. दोन प्रकारचे मामा असतात. एक भाचांना आशीर्वाद देणारे आणि दुसरे शकुनी मामा. कंसाच्या जीवावर उठल्यासारखे तुम्ही शकुनी मामा बनू नका. हे लोक तुम्हाला प्रेमाने मामा म्हणतात पण गल्ली मैदान फार दूर नाही, लढाई जोरात होईल आणि तुम्हाला मग हे जमीन दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. कामगार हा कष्टकरी असतो, श्रम करणार असतो आणि तो श्रमाच्या जीवावर आपली रोजी रोटी करतो. जर तुम्ही राजकारण केलं तर आम्ही सगळे संघटित होऊ. राजकारणाच्या पलीकडे आम्ही ज्या पक्षांमध्ये काम करतो इथे बसलेले लोक आम्ही सगळे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करतो आणि म्हणून इथे आम्ही समाजकारण करण्यासाठी या सगळ्या बांधवांच्या बरोबर बसलेले आहेत. जर तुम्ही वेळीच आवर घातला नाही आणि न्याय दिला नाही तर आम्ही तुम्हाला जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.