मोठी बातमी : पोलीस कर्मचाऱ्याने वाळूमाफियाला मागितली अडीच लाखांची लाच

महा पोलीस न्यूज । २६ जुलै २०२४ । जळगाव जिल्ह्यातील भडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराने वाळू व्यवसायिकाला २ लाख ६० हजारांची लाच मागितली. तडजोडी अंती ५० हजारांची लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या मुसक्या आवळल्या. शुक्रवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. वाळूमाफियांकडून पोलिसांना अडकवण्याची कारवाई नेहमीच होते तरीही पोलीस वाळूमाफियांना अभय देतात.
मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव येथील २८ वर्षीय तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्यावर यापुर्वी भडगांव पोस्टेला अवैध वाळू वाहतूकी संदर्भात दोन गुन्हे दाखल आहे . तक्रारदार यांना सुरळीत वाळू वाहतूक करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी भडगाव पोलीस ठाण्यातील हवालदार किरण रविंद्र पाटील वय-४१ यांनी २ लाख ७० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी याबाबत जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
तक्रारीची गुरुवार दि.२५ जुलै रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता हवालदार किरण पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे २ लाख ६० हजाराची मागणी करून त्यातील पहिला हप्ता म्हणून तडजोडीअंती पंचासमक्ष ५० हजार रुपये लाच रक्कम देण्याचे ठरले. शुक्रवार दि.२६ रोजी किरण पाटील यास लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. याप्रकरणी भडगांव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
संपूर्ण कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने केली आहे. पोलीस प्रशासनात आज झालेल्या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.