हॉटेलचा रिसेप्शनीस्टच निघाला सोनसाखळी चोर, जिल्हापेठ पोलिसांनी केली अटक

महा पोलीस न्यूज | २२ मे २०२३ | जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये थांबलेल्या तरूणाची प्रकृती खालावल्याने तो तिथेच रुग्णालयात दाखल झाला होता. रिसेप्शन काऊंटर ठेवलेल्या बॅगेतून कुणीतरी सोन्याची चेन आणि लॉकेट लंपास केले होते. जिल्हापेठ पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अवघ्या २ तासात त्याला पकडले आहे.
धुळे येथील रहिवासी असलेला राहुल मधुकर जाधव हा सध्या दुबई येथे वास्तव्यास असून मित्रांना भेटण्यासाठी दि.२० मे रोजी जळगांव येथे येवून हॉटेल स्टार पॅलेस लॉजींग व बोडींग येथील रुम नं.२०७ मध्ये थांबलेला होता. तेव्हा त्याची प्रकृती खराब झाल्याने तो त्या हॉटेल स्टार पॅलेसच्या बेसमेंटमध्ये असलेल्या साई सिंधु हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला होता. तेव्हा त्याने त्याची काळ्या रंगाची बॅग ही रिसेप्शन काऊंटरवर ठेवलेली होती.
दि.२१ रोजी त्याची प्रकृती बरी झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. तो पुन्हा हॉटेल स्टार पॅलेसच्या रिसेप्शन काऊंटरवर ठेवलेली त्याची बॅग घेण्यास आला. बॅगेत ठेवलेली त्याची सोन्याची चेन व दोन पेंडल तसेच इतर कपडे असे त्याने तपासले असता त्याला त्याची सोन्याची चेन व दोन पेंडल बॅगेत दिसून आले नाही. तेव्हा त्याने रिसेप्शन काऊंटरवर बॅगमधील सोन्याची चैन व दोन पेंडल बाबत चौकशी केली असता, त्यांनी त्या बाबत आम्हाला काही एक माहिती नाही असे सांगीतले.
राहुल जाधव यांनी याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला येवून तक्रार दिल्याने जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे तपासकामी पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांनी लागलीच पथक रवाना केले. पथकाने घटनास्थळी जावून तेथे असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली व रिसेप्शनीस्ट स्टाफ, रुम क्लिनर स्टाफ तसेच रुम अटेंडन्स स्टाफ, अश्यांची कसून चौकशी केली. रिसेप्शनीस्ट केतन धोंडु पाटील, वय-२९ रा.मु.पो.पाळधी ता.मुक्ताईनगर जि.जळगांव ह.मु.हॉटेल स्टार पॅलेस जळगांव याच्या हालचाली थोड्या संशयास्पद वाटल्याने त्यास अधिक चौकशीकामी ताब्यात घेतले.
पावणे दोन लाखांचा ऐवज हस्तगत
पोलीस स्टेशनला आणुन त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्यात चोरीस गेलेला माल हा मीच चोरलेला असून तो हॉटेल स्टार पॅलेस येथील रुम न.२०३ मधील कपाटाच्यावर लपवुन ठेवलेला आहे, अशी कबुली दिल्याने त्याठिकाणी जावून चोरीस गेलेली १ लाख १५ हजार ६०० रुपयांची १७ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, ३४ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅमचे आणि २० हजार ४०० रुपयांचे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडेंट असा मुद्देमाल हस्तगत केला.
या पथकाने केली कारवाई
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत व पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांनी केलेल्या मार्गदर्शनाने गुन्हे शोध पथकातील हवालदार सलीम तडवी, पोलीस नाईक जुबेर तडवी, अमितकुमार मराठे, मिलींद सोनवणे, तुषार पाटील, जयेश मोरे यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस नाईक राजेश पदमर हे करीत आहेत.