अमळनेर तालुक्यात एकाच रात्रीत तीन ठिकाणी चोरी

महा पोलीस न्यूज । पंकज शेटे । अमळनेर तालुक्यातील कुर्हे गावात एकाच रात्रीत तीन ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. दि. ३१/०७/२०२५ च्या पहाटे २ ते ४ वाजेदरम्यान चोरट्यांनी गावातील तीन घरांना लक्ष्य केले. या घटनेमुळे गावामध्ये भीतीचे वातावरण पसIरले आहे.
या चोरीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी सुरेश राजाराम पाटील (वय ६२, धंदा-शेती) यांच्या घरातून सुमारे २१ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपये रोख रक्कम लंपास केली.
दुसऱ्या घटनेत, अर्जुन गणपत पाटील (वय ५०, धंदा-शेती) यांच्या घरातून चोरट्यांनी १५ ग्रॅम सोने, १ लाख ६० हजार रुपये रोख रक्कम आणि चांदीचे ५ देव चोरून नेले.
तिसरी घटना सचिन भिका ठाकूर (वय ३६, धंदा-वेल्डिंग काम) यांच्या घरी घडली. त्यांच्या घरातून १० ग्रॅम चांदी, ७ हजार रुपये रोख रक्कम आणि चांदीचे ५ देव असा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, तपास सुरू केला आहे. एकाच रात्रीत तीन ठिकाणी झालेल्या या चोरीच्या घटनांमुळे गावात पोलिसांच्या गस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.