जळगावच्या तिघांचे अपहरण, एमआयडीसी पोलिसांनी छत्तीसगडहून केली सुटका
महा पोलीस न्यूज । ५ जून २०२४ | जळगाव शहरातील एका व्यापाऱ्याच्या ३ नातेवाईक व मित्रांचे अपहरण करुन खंडणी मागण्यात आली होती. छत्तीसगड जिल्ह्यात तिघे असल्याची माहिती मिळाल्यावरून एमआयडीसी पोलिसांनी दमदार कामगिरी करीत तीनही अपहृत व्यक्तींची सुटका केली. तसेच अपहरण करणाऱ्या चार जणांना छत्तीसगड जिल्ह्यातील एका लॉजमधून ताब्यात घेत अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चौघांवर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
भुसावळ येथील नवजीवन सोसायटीला राहणारे सागर कमल लुल्ला (वय २४) यांचे जळगाव शहरात सिंधी कॉलनी परिसरात शेअर मार्केटिंगचे दुकान आहे. काही दिवसापूर्वी त्यांचे नातेवाईक व मित्रांना अज्ञात व्यक्तींनी जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील साई सिटी परिसरातून अपहरण करून पळवून नेले होते. त्यानंतर अज्ञात व्यक्तींनी वेळोवेळी फिर्यादी सागर लुल्ला यांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना फोन करून सुरुवातीला २५ लाख नंतर ८ लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
अपहरण केलेल्या तिघांना जीवे मारण्याची धमकी देण्यात येत होती. याप्रकरणी अपहरण करणाऱ्या संशयित आरोपींनी सुरुवातीला १ लाख २० हजार व नंतर ७० हजार असे १ लाख ९० हजार रुपये खंडणी म्हणून स्वीकारले होते. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होताच गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता अपहरण करणारी व्यक्ती अनोळखी असल्याने तसेच अपहरण झालेल्या व्यक्तींचे मोबाईल फोन बंद येत असल्याने पोलिसांनी लागलीच तपास सुरु केला.
एमआयडीसी पोलिसांनी त्यांचे कौशल्य आणि तांत्रिक विश्लेषणाची मदत घेत अपहरण झालेल्या इसमांची माहिती काढली. हे सर्वजण छत्तीसगड येथे गेले असल्याचे समजल्याने त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला. घटनेतील तीन अपहरण झालेले व्यक्ती आणि अपहरण करणारे व्यक्ती हे छत्तीसगड येथील राजनांदगाव येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. पथक त्यांच्या सुटकेसाठी रवाना झाले होते.
तिघांची केली सुटका
राजनांदगाव येथे १० ते १२ तास शोध घेतल्यानंतर तसेच हॉटेल व लॉजेस तपासल्यानंतर एका हॉटेलमध्ये सात व्यक्ती संशयितरित्या थांबून असल्याची माहिती मिळाली. तेथे जाऊन पाहणी केली असता अपहृत झालेले रोहित कैलास दर्डा, विशाल अनिल शुबवाणी, अजय ठाकरे हे दिसून आले. तसेच त्यांच्यासोबत त्यांचे अपहरण करणारे चार संशयित आरोपी देखील मिळून आले. अपहृत झालेल्या व्यक्तींना अपहरण करणाऱ्यांच्या ताब्यातून पोलिसांनी सुखरूप सोडवित अपहरण करणाऱ्यांना अटक केली.
चौघांना ४ दिवस पोलीस कोठडी
अश्विनी हरीश कुमार माखीजा (वय ३६, रा. रायपूर, छत्तीसगड), संजय आरतमनी मिश्रा (रा. रसूलहा ता. थाडपट्टी जि. प्रतापगड उत्तर प्रदेश), दिलीप शेषनाथ मिश्रा (रा.रायपूर, छत्तीसगढ), आनंद श्रीतीर्थराज मिश्रा (रा. लखनऊ तेलीबाग, उत्तर प्रदेश)असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्यांच्यावर गंभीर खुनासारखे गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी सर्वांना ताब्यात घेऊन जळगावात आणले. संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस नाईक किशोर पाटील, योगेश बारी, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, किरण पाटील, चंदू पाटील, गणेश ठाकरे यांनी केलेली आहे. दमदार कामगिरीबद्दल एमआयडीसी पोलिसांचे कौतुक होत आहे.