Other

थरारक : गोवंश तस्करांचा पाठलाग, जीवघेण्या हल्ल्यात एलसीबी निरीक्षक जखमी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातून गोवंश तस्करी नेहमीच सुरु असली तरी अनेकदा पोलिसांकडून कारवाई केली जात असते. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे रात्री गस्तीवर असताना गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करीत होते. जळगाव ते अकोला पाठलाग केल्यानंतर वाहनाला पकडण्यात त्यांना यश आले मात्र तस्करांनी वाहन रिव्हर्स घेत त्यांनाच दाबण्याचा प्रयत्न केला. घटनेत संदीप पाटील जखमी झाले असून अकोला पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप पाटील हे उपनिरीक्षक अनिल जाधव आणि पोलीस चालक दर्शन ढाकणे यांच्यासह रविवारी रात्री जिल्हा गस्तीवर होते. मुक्ताईनगरजवळ असताना एका इनोव्हा कारमधून गोवंश तस्करी होत असल्याचा त्यांना संशय आला. वाहन चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्याठिकाणाहून पळ काढला.

जळगाव ते अकोला पाठलाग
मुक्ताईनगरपासून निरीक्षक संदीप पाटील यांनी पथकासह वाहनाचा पाठलाग सुरु केला. मुक्ताईनगरपासून मलकापूर, नांदुरा, बाळापूरमार्गे अकोलाजवळ इनोव्हाला ओव्हरटेक करीत अडवण्यात पथकाला यश आले. निरीक्षक संदीप पाटील यांनी इनोव्हाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता त्याने वाहन मागे घेत त्यांनाच दाबण्याचा प्रयत्न केला.

एलसीबी निरीक्षक जखमी, एकाला पकडले 
पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे दाबले गेल्याने त्यांच्या छातीला आणि बरगड्यांना दुखापत झाली तसेच पाय आणि चेहऱ्याला देखील खरचटले आहे. स्वतःला सावरत संदीप पाटील यांनी बाजूला होत स्वतःचा बचाव केला. चालकाला त्यांनी वाहनासह त्यांनी ताब्यात घेतले मात्र इतर तिघांनी पळ काढला. पुढे जिल्हा नियंत्रण कक्षातून माहिती घेत संदीप पाटील यांनी खामगाव आणि अकोला पोलिसांना माहिती दिली.

अकोला पोलिसांची नाकाबंदी, आरोपी फरार
अकोला पोलिसांनी लागलीच नाकाबंदी केली. दरम्यान तिघांनी पळ काढला. याप्रकरणी अकोला पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. गोवंश तस्करांची हिम्मत इतकी वाढली आहे कि ते आता पोलिसांवर देखील हल्ला करू लागले आहे. गोवंश तस्करांना लगाम घालण्यासाठी पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घेणे आवश्यक आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button