भोंदूबाबाने चोरले दागिने, दोन वर्षांनी शनिपेठ पोलिसांनी धरले
महा पोलीस न्यूज | १९ फेब्रुवारी २०२४ | वास्तूदोष दूर करण्याच्या बहाण्याने घरात येत सोन्याचे दागिने घेऊन फरार झालेला भोंदूबाबा हरीष उर्फ हरी गुलाब गदाई (रा.देवगाव राजापूर, ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर) याला शनिपेठ पोलिसांनी अटक केली. दोन वर्षानंतर पोलिसांनी त्याला पहूर येथून मुद्देमालासह ताब्यात घेतले.
आसोदा रोड परिसरातील रहिवासी असलेल्या छाया रतन बाविस्कर यांच्याकडे दि.२६ जानेवारी २०२२ रोजी असलेल्या पुजेच्या ठिकाणी सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याच्या बाळ्या ठेवल्या होत्या. दुपारच्या सुमारास भगवे कपडे घालून एक भोंदूबाबा त्याठिकाणी आला. तुमच्या घरात वास्तूदोष असल्याचे सांगत पूजा करावी लागेल असे त्याने सांगितले. महिलेने त्यावर विश्वास ठेवला आणि चहा तयार करण्यासाठी त्या घरात गेल्या. महिला घरात जाताच भोंदूबाबाने पुजेत ठेवलेले २५ हजार रुपये किंमतीचे दागिने घेवून पळ काढला. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा अनुषंगाने तपास सुरू असताना भोंदूबाबा पहूर परिसरात असल्याची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, हवालदार परिष जाधव, राहुल पाटील, राहुल घेटे, अनिल कांबळे, भागवत शिंदे यांना पहूर येथे रवाना केले. पथकाने दि.१८ फेब्रुवारी रोजी रात्री भोंदूबाबा हरीष उर्फ हरी गुलाब गदाई याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने मुद्देमाल काढून दिला.