दुर्दैवी : आईच्या डोळ्यादेखत बिबट्याने मुलाले ओढत नेले, बालकाचा मृत्यू

महा पोलीस न्यूज । दि.६ मार्च २०२५ । जळगाव वन विभागाच्या कार्यक्षेत्रात गुरुवारी दि.६ मार्च रोजी दुपारी भीषण घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यात ७ वर्षीय आदिवासी बालकाचा मृत्यू झाला. आईच्या डोळ्यादेखत बिबट्याने केशाला ओढून नेले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे साकळी, किनगाव परिसरासह संपूर्ण यावल तालुका हादरला आहे.
यावल येथील पश्चिम वनक्षेत्रपाल सुनील भिलावे यांच्या कार्यक्षेत्रातील मौजे किनगाव तालुका यावल येथील शेतकरी केतन सुरेश चौधरी यांचे मौजे साकळी ता.यावल या शेती शिवारातील मालकी गट नं ४७२ यात कामास असलेले पेमा बुटसिंग बारेला यांचा मुलगा केश्या बारेला (वय ७) हा बालक आपल्या आईसोबत शेताजवळ असताना अचानक बिबट्याने हल्ला केला. आईच्या डोळ्यादेखत बिबट्याने केशाला ओढून नेले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, घटनास्थळी उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव जमीर शेख, सहा. वनसंरक्षक चोपडा, यावल प्रथमेश हडपे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थ व शेतकरी यांचेशी चर्चा करून घ्यावायची काळजीबाबत मार्गदर्शन केले. तसेच वन कर्मचारी अधिकारी सूचना जनजागृती करण्याच्या सूचना केल्या.
तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत बालकाचे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशमधील असून, गेल्या सहा महिन्यांपासून साकळी शिवारात मजुरीचे काम करत होते. पंचनामा करून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
सुरक्षेच्या दृष्टीने पंचक्रोशीत अलर्ट जारी करण्यात आला असून, दवंडी देण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. बिबट्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ओढे आणि पाणी साठवण भागांमध्ये पिंजरे लावण्याचे काम सुरू आहे. तसेच शेतांमध्ये दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी वीज वितरण कंपनीला निर्देश देण्यात आले आहेत.
या दुर्घटनेनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ.चंद्रकांत सोनवणे यांनी दुःख व्यक्त करत वन विभागाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.