भडगाव गिरणा नदी पात्रातील घटना २७ वर्षीय तरुण व १६ वर्षीय तरुणी दोघेही बुडाले
दुःखद घटना : मुलांना वाचवताना दोघांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

भडगाव प्रतिनिधी :- भडगाव शहरालगतच्या गिरणा नदीपात्रात मुलांना वाचवण्यासाठी धाडसाने नदीत उतरलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. या दुर्दैवी घटनेमुळे भडगाव शहरासह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नदीम खान नसीम खान (वय २७) व काफिया शरीफ पिंजारी (वय १६) हे दोघे नदीपात्रात अडकलेल्या लहान मुलांना वाचवण्यासाठी तातडीने नदीत उतरले. मात्र नदीपात्रातील खोल खड्ड्यांमुळे त्यांचा तोल जाऊन दोघेही पाण्यात बुडाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता.
दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या मते नदीपात्रात रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साहाय्याने सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे मोठ्या प्रमाणात खोल खड्डे तयार झाले आहेत. याच खड्ड्यांमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. महसूल विभागाचे अविनाश जंजाळे व प्रशांत कुंभारे, पोलिस निरीक्षक महेश शर्मा, राजू अहिरे,इकबाल शेख यांनी घटनास्थळी पाहणी केली.
नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी पाचोरा येथून नदीत शोधमोहीम राबवण्यासाठी कर्मचारी पाठवले. आरोग्य विभागाचे छोटू वैद्य, अजय कंडारे तसेच पाचोरा येथील गोताखोर हुसेन दादा यांनी शोध व मदतकार्यात मोलाची भूमिका बजावली.
मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांनी प्राण गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, नदीपात्रातील अवैध वाळू उपशावर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर पाटील यांनी भडगाव ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.






