४८ तासांत मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस

४८ तासांत मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस
उमरखेड डिटेक्शन बेंचची धडक कारवाई
उमरखेड (यवतमाळ): उमरखेड पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन बेंचने (DB) अवघ्या ४८ तासांत मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीला अटक केली आहे. दिनांक २९ मार्च २०२५ रोजी फिर्यादी प्रताप मंगलचंद पडवाळे (वय ५०, रा. सोनदाभी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन उमरखेड येथे अपराध क्रमांक १९६/२०२५, कलम ३०३(२) BNS अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन बेंचचे प्रमुख पोउपनि सागर इंगळे आणि त्यांच्या टीमने तातडीने कारवाई सुरू केली. टीमने घटनास्थळाजवळील बस स्टँड परिसरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, आरोपी फिर्यादीची मोटरसायकल घेऊन जाताना दिसला. पुढील सीसीटीव्ही फुटेज तपासताना आरोपी बिटरगाव रस्त्याने जात असल्याचे आढळले. या फुटेजच्या आधारे गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती घेतली असता, आरोपीची ओळख संतोष पांडुरंग खंदारे (वय २५, रा. पैदा, ता. किनवट, जि. नांदेड) अशी निश्चित झाली.
त्यानंतर डिटेक्शन बेंचने आरोपीचा शोध घेतला असता, तो त्याच्या घरासमोर चोरीच्या मोटरसायकलसह आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. त्याच्याकडून चोरी गेलेली हिरो कंपनीची पॅशन प्रो DRS (क्रमांक MH-29-AJ-7202) ही मोटरसायकल जप्त करण्यात आली, जिची किंमत अंदाजे ३०,००० रुपये आहे.
ही यशस्वी कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी बी.जे. हर्षवर्धन आणि पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. डिटेक्शन बेंचचे प्रमुख पोउपनि सागर इंगळे, पोहेकॉन्स्टेबल संदीप ठाकुर (२०२०), पोलीस शिपाई टेंभरे (१६५२) आणि पोलीस शिपाई निवृत्ती महाळनर (११९१) यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉन्स्टेबल संदीप ठाकुर करीत आहेत.
या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत असून, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दलाचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते.