किरकोळ वादातून तरुणाचा खून करून जाळले, नाशिक ग्रामीण एलसीबीकडून गुन्ह्याचा उलगडा
महा पोलीस न्यूज | संजय तांबे – नाशिक प्रतिनिधी | अभोणा पोलीस ठाणे हद्दीत दि.८ मार्च रोजी रात्रीच्या वेळी अभोणा ते कनाशी रोडवरील गोळाखाल शिवारात पुलाखालील नाल्यात एका अज्ञात इसमाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळून आला होता. कोणताही सबळ पुरावा नसताना नाशिक ग्रामीण एलसीबी पथकाने अथक परिश्रम करून मयत तरुणाची ओळख पटवली असून खुनाचा गुन्हा उघड केला आहे. किरकोळ वादातून तरुणाला मारहाण करीत त्याचा मृतदेह जाळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नाशिक ग्रामीण एलसीबी पथकाने केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
सविस्तर माहिती अशी की, अभोणा पोलीस ठाणे हद्दीत दि.८ मार्च रोजी रात्रीच्या वेळी अभोणा ते कनाशी रोडवरील गोळाखाल शिवारात पुलाखालील नाल्यात एका अज्ञात इसमाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळून आला होता. यातील अनोळखी मयतास कोणीतरी अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणावरून जीवे ठार मारून मयताची ओळख पटू नये म्हणून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मृतदेह जाळुन टाकण्याचा प्रयत्न केला म्हणून दि.९ रोजी अभोणा पोलीस ठाणेस गुरनं ३३/२०२४ भादवि कलम ३०२,२०१ प्रमाणे अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयात यातील आरोपीतानी कोणताही थागा-दोरा मागे न ठेवता मयताची ओळख पटू नये म्हणुन निर्जनस्थळी सदरचा मृतदेह जाळला होता.
खुनाच्या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग किरण सुर्यवंशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, अभोणा पो.स्टे. वे सहा. पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी पोलीस पथकांसह घटनास्थळास भेट देवून पाहणी केली. घटनास्थळावर फॉरेन्सीक टिम व श्वानपथकास पाचारण करण्यात आले. तसेच मयताच्या शरीराचे निरीक्षण केले असता, त्याचे अंगावर मिळून आलेल्या वीज-वस्तू व चेहरा यावरून त्याची ओळख पटविण्यासाठी नाशिक ग्रामीण व आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाणे तसेच नजीकचे जिल्हयांमध्ये मयताचे वर्णनासह तपास याद्या प्रसारीत करण्यात आल्या होत्या. परंतु मृतदेहाची ओळख पटविण्यात अपयश येत होते.
खुनाचे गुन्हयाचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटना घडल्यापासुन सलग सात दिवस कनाशी व अभोणा परिसरात तळ ठोकून गोपनीय माहिती घेत होते. घटना घडली त्यादिवशी महाशिवरात्रीचा सण व कळवण तालुक्यात सिध्देश्वर मंदिर येथे जत्रा असल्याने अभोणा ते कनाशी रोडवर वर्दळ होती. त्याप्रमाणे घटनास्थळाचे आजुबाजूचा परिसर तसेच नजीकच्या पाडयांवर स्थागुशाचे पथकाने गोपनीय माहिती घेतली असता, घटनेच्या दिवशी एक काळे रंगाची फोर व्हीलर कनाशी रोड परिसरात आली असल्याची पुसटशी माहिती पथकास मिळाली होती.
माहितीच्या आधारे पोलीसांनी तपासाची दिशा निश्चित करून सातत्याने अथक परिश्रम करून घटनास्थळ परीसरात मिळुन आलेल्या भौतिक व तांत्रिक बाबींचे अचूक विश्लेषण करून मिळालेल्या माहीतीव्दारे ठाणे जिल्हयातील भिवंडी येथील काळया रंगाचे इनोव्हा कार चालक मालकाबाबत गोपनीय माहिती घेवुन भिवंडी व मुंब्रा येथून शहानवाज उर्फ बबलु शोएब शेख, वय ४६, रा. रूम नं. २३, खालीदशेठ धाळ, भिवंडी, जि. ठाणे आणि सादिक इब्राहिम खान, वय ४८, रा. वारसी टॉवर, ४०२, सावरकर नगर, मुंब्रा, जि. ठाणे या दोघांना ताब्यात घेतले.
दोन्ही संशयीतांना गुन्हयाचे तपासात, विश्वासात घेवून कसोशीने चौकशी केली असता दि.८ मार्च रोजी ते दोघे व त्यांचेसह आणखी तिघे हे भिवंडी येथून मालेगाव शहरात आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे चौकशी केली असता, यातील संशयीत शहानवाज उर्फ बबलु व साजीदखान यांचेसह तिसरा इसम हा शहारूफ खान आला असल्याचे समजले, त्याबाबत खात्री केली असता त्याचे पुर्ण नाव शहारूफ खान मेहबुब खान, रा. सेक्टर नं. १५, वाशी, नवी मुंबई, मुळ रा. आझमगड, उत्तरप्रदेश असे असल्याचे निदर्शनास आले. त्याचा फोटो प्राप्त करून मयताचे वर्णनाशी व त्याचे नातेवाईकांकडे खात्री केली असता यातील मयत हा शहारूफ खान हाच असल्याचे निष्पन्न झाले असून नातेवाईकांकडे केलेल्या चौकशीत मयताची ओळख पटली आहे.
पोलिसांनी आरोपीतांनी गुन्हयात वापरलेली काळ्या रंगाची इनोव्हा कार क्रमांक एमएच.०१.एई.०००८ या वाहनासह त्यांचे वापरते मोबाईल गुन्हे तपासकामी जप्त केले असून आरोपींना गुन्हयाचे पुढील तपासकामी अभोणा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. संशयीत आरोपी नामे शहानवाज उर्फ बबलु शोएब शेख व सादिक इब्राहिम खान हे फोर व्हिलर खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असून घटनेच्या दिवशी ते मालेगाव शहरात फोर व्हिलर कार बघण्यासाठी आले होते. त्यांनी त्यांचे मालेगाव येथील अन्य साथीदारांसह (नावे निष्पन्न झालेली आहे) आपसात संगनमत करून मयत शहारूफ खान मेहबुब खान याचे वर्तनाला कंटाळून त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तो बेशुध्द झाल्यानंतर, तो मयत झाला आहे असे समजून मालेगावपासून इनोव्हा कारने अभोणा पोलीस ठाणे हद्दीतील निर्जनस्थळी येवून फेकले. तसेच त्याठिकाणी पेट्रोल टाकून त्याचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे.
संपूर्ण कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक दत्तात्रय कराळे, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग किरण सुर्यवंशी यांनी केलेले मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि गणेश शिंदे, पोउनि संदिप पाटील, पोहवा नवनाथ सानप, चेतन संवस्तरकर, पोना विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, योगेश कोळी, प्रदिप बहिरम, शरद मोगल, चापोहवा भवर, विकी म्हसदे यांचे पथकाने केली आहे.