उन्मेष पाटलांचा खासदारकीचा राजीनामा, शिवसेनेत केला प्रवेश
महा पोलीस न्यूज | ३ एप्रिल २०२४ | भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा पत्ता कट झाल्यानंतर ते नाराज होते. उन्मेष पाटील हे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, बुधवारी उन्मेष पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला असून शिवसेना (ऊबाठा) गटात प्रवेश केला आहे.
जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांना पुन्हा उमेदवारी न देता माजी आ.स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नाराज असलेले उन्मेष पाटील शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसापासून होत होती. अखेर या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला असून उन्मेष पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.
दरम्यान, पक्षप्रवेशापूर्वी उन्मेष पाटील यांनी आपला खासदारकीचा राजीनामा दिला आहे. आपल्या पदाचा राजीनामा त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे फॅक्स केला. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना उन्मेष पाटील यांच्या प्रवेशामुळे जळगावात भाजपला मोठा धक्का बसला आहे. उन्मेष पाटील यांच्यासोबत पारोळा येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष करन पवार देखील शिवसेनेत गेले आहेत. दोघांपैकी एकाला जळगावातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.