उत्तरकाशीत ढगफुटी; पूर आणि भूस्खलनात ४ मृत, अनेक बेपत्ता ; युद्धपातळीवर मदतकार्य

उत्तरकाशीत ढगफुटी; पूर आणि भूस्खलनात ४ मृत, अनेक बेपत्ता – युद्धपातळीवर मदतकार्य
उत्तरकाशी (प्रतिनिधी) – उत्तराखंड राज्यात मुसळधार पावसाचा कहर सुरू असताना उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात ढगफुटी सदृश पावसानंतर अचानक आलेल्या पूरामुळे मोठे संकट ओढावले. या नैसर्गिक आपत्तीमुळे ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी भारतीय लष्कर, एसडीआरएफ आणि प्रशासनाने युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे.
हॉटेल्स, घरे वाहून गेली; व्हिडीओ समोर
धराली येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास ढगफुटीसदृश पावसामुळे प्रचंड पूर आला. या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून त्यात अनेक हॉटेल्स, घरे आणि दुकाने नदीच्या पाण्यासोबत वाहून जाताना दिसत आहेत. हर्षिलपासून अवघ्या १० किमी अंतरावर ही दुर्घटना घडली. पूर आणि भूस्खलनामुळे संपूर्ण परिसरात हाहाकार उडाला.
जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी प्रशांत आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, “या भागात ढगफुटीमुळे अचानक पूर आल्याने मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. काही घरं आणि व्यवसायिक इमारती पूर्णतः वाहून गेल्या आहेत.”
उपजिल्हाधिकारी शालिनी नेगी यांनी सांगितले की, “घटनास्थळी पोहोचण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. काही ठिकाणी संपर्क तुटलेला आहे. जीवितहानी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.”
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची तातडीची दखल
या दुर्घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. एक्स (Twitter) वर पोस्ट करत त्यांनी लिहिले, “उत्तरकाशीतील दुर्घटनेत बाधित लोकांप्रती माझ्या संवेदना आहेत. केंद्र सरकार राज्य सरकारसोबत संपर्कात असून मदतीसाठी पूर्ण पाठिंबा दिला जाईल.”
मुख्यमंत्री धामी यांनीही परिस्थितीवर लक्ष ठेवत तातडीने नागरिकांचे स्थलांतर सुरू केले असल्याचे सांगितले. “बचावकार्यात कोणतीही कसूर राहणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
रेड अलर्ट जारी – पुढील पावसाचा धोका कायम
राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असून हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रशासन आणि नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.