विधानसभा निवडणूक २०२४ : भाजपात जळगाव शहरात चालणार मराठा कार्ड?
महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | लोकसभा निवडणुकीनंतर जळगाव शहरात भाजपचे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. भाजपाने नुकतेच केलेले काही फेरबदल भाजपच्या पथ्यावर पडले असल्याचे दिसत असले तरी त्यात स्थानिक भाजपपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा वाटा आहे. लोकसभेमुळे विधानसभा देखील आपल्याकडे ठेवण्याच्या उद्देशाने भाजप काही नवीन व्ह्युरचना केली जात आहे. एवढेच नव्हे तर जरांगे फॅक्टर लक्षात घेता भाजपकडून जळगाव शहरात मराठा कार्ड खेळले जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघ भाजपचा गड मानला जातो. गेल्या अनेक वर्षापासून भाजपने आपला जळगाव जिल्हा लोकसभेत कायम ठेवला असला तरी विधानसभेला मात्र तसे चित्र नाही. जळगावात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी एकहाती सत्ता ठेवली होती मात्र घरकुल घोटाळा आणि मोदी फॅक्टरमुळे २०१४ ला भाजपचे सुरेश भोळे विजयी झाले. २०१९ मध्ये देखील पुन्हा त्यांनी विजय साधला मात्र मंत्रिपदाने त्यांना हुलकावणी दिली. जळगाव शहरात भाजपात पूर्वीपासून सक्रिय असलेले विद्यमान आ.सुरेश भोळे यांनी कार्यकर्ता ते आमदार व्हाया नगरसेवक असा प्रवास केला आहे. जळगावातून त्यांनी दिग्गज नेते सुरेश जैन यांचा पराभव करीत किमया केली आणि सलग दोन वेळा विजय मिळवला. दोनदा विजयी झाल्यानंतर आ.भोळे यांना मंत्रिपद मिळणार असे बोलले जात होते मात्र तरीही विस्तारात त्यांचा नंबर लागला नाही.
२०२४ चा मराठा चेहरा कोण?
जळगाव शहर विधानसभा मतदार संघात लेवा पाटील समाजाचे वर्चस्व असल्याचे बोललं जाते परंतु मराठा समाजाचे मतदार अधिक म्हटले जाते. समाजाच्या आधारे उमेदवारी निश्चित करायचे पक्षाने ठरवल्यास जिल्हा दूध संघाचे संचालक रोहीत निकम यांचे नाव आघाडीवर आहे. इच्छुक उमेदवारांमध्ये लेवा पाटील, कोळी समाजाचे उमेदवार असले तरी एकमेव पर्याय म्हणून रोहित निकमांच्या नावाला पसंती दिली जाईल. सहकार आणि बूथ नियोजनाचा अनुभव त्यांच्या पथ्यावर पडेल असे राजकीय तज्ज्ञांकडून म्हटले जात आहे. दरम्यान, जरांगे फॅक्टरमुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेतही फटका बसू नये म्हणून भाजपकडून जिल्ह्यासह राज्यात मराठा उमेदवार अधिक देण्याचा प्रयत्न असणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपकडे आजच्या घडीला चाळीसगाव मतदार संघातून मंगेश चव्हाण हे एकमेव मराठा आमदार आहेत. त्यामुळेच जळगावातही मराठा कार्ड खेळले जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.