जळगावात ‘सेवा पंधरवड्या’त ५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

जळगावात ‘सेवा पंधरवड्या’त ५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव वन विभागामार्फत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवड्या’ निमित्त जिल्ह्यात ५ लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आज (११ सप्टेंबर २०२५) झालेल्या पत्रकार परिषदेत वन विभागाने ही माहिती दिली.
या बैठकीला जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती अर्चना मोरे, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी सुदर्शन कालिदास शिसव, तसेच सहायक वनसंरक्षक अमोल पंडित, समाधान पाटील आणि धनंजय पवार उपस्थित होते.
या मोहिमेत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत विविध शासकीय विभागांना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तसेच, ज्या शासकीय यंत्रणा किंवा नागरिकांना रोपांची गरज असेल, त्यांनी सामाजिक वनीकरण आणि वन विभागाकडे नोंदणी केल्यास वन महोत्सवाच्या काळात सवलतीच्या दरात किंवा नियमाप्रमाणे मोफत रोपे उपलब्ध करून दिली जातील.
वन विभागाने सर्व नागरिकांना आणि शासकीय यंत्रणांना ‘एक पेड मा के नाम’ (केंद्र शासन) आणि ‘अमृत वृक्ष’ (महाराष्ट्र शासन) या ॲपवर लावलेल्या रोपांची माहिती भरण्याचे आवाहन केले आहे. सर्वांनी या मोहिमेत सहभागी होऊन जास्तीत जास्त वृक्षारोपण करून ‘सेवा पंधरवडा’ यशस्वी करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.






