चोपडा ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी, ७ गावठी कट्टे, १० काडतूस पकडले

महा पोलीस न्यूज । दि.२२ सप्टेंबर २०२४ । चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे. पथकाने सापळा रचून पुणे, सातारा, कोल्हापूरला गुन्हे दाखल असलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना लासूर गावाजवळ पकडले आहे. दोघांकडून ७ गावठी कट्टे, १० जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून आणखी चौकशी सुरू आहे.
मध्यप्रदेश राज्याकडून चोपडा ग्रामिण पो.स्टे. हद्दीचे मार्गातून अवैध अग्नीशस्त्राची विक्री व वाहतुक करणारे गुन्हेगार यांची गुप्त बातमीद्वारे माहीती काढुन अशा गुन्हेगारांवर प्रतिबंध करण्यासाठी पो.स्टे. हद्दीत सतत गस्त व बातमीदार पाळत ठेवुन प्रभावी कार्यवाही करण्याचा सुचना पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिल्या होत्या.
चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या निरीक्षक कावेरी कमलाकर यांना दि.२० रोजी गुप्त बातमीदारा मार्फत पारउमर्टी, (मध्यप्रदेश) कडून लासुर ते हातेड रोडने दोन इसम मोटार सायकलने गावटी बनावटीचे कट्टे (पिस्टल) घेवुन येत आहेत अशी गुप्त बातमी मिळाली होती. बातमीची खात्री करुन कारवाई करण्यासाठी त्यांनी लासुर ते हातेड रस्त्यावर पाटचारी पुलाजवळ सापळा लावला. दुपारी १२.३९ वाजता लासुर गावाकडुन एका मोटार सायकलवर दोन इसम येतांना दिसले. दोघांना पोलिसांनी अडवत त्यांचे अंगझडती घेतली असता ७ गावठी कट्टे (पिस्टल), १० जिवंत काडतुस, २ मोबाईल हॅन्डसेट, १ मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आला.
याप्रकरणी हवालदार राकेश पाटील यांनी फिर्याद दिल्यावरुन चोपडा ग्रामीण पोलिसात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ७/२५, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सागर शरणम रणसीरे वय २४ वर्षे, रा.धायरी फाटा, पुणे, मनोज राजेंद्र खांडेकर वय २५ वर्षे, रा. मु.पो.जुळेवाडी, ता.कराड, जिल्हा सातारा यांना गुन्ह्याचे तपासकामी अटक केली आहे. दोघांवर पुणे, सातारा, कोल्हापुर जिल्ह्यात गुन्हे दाखल असल्याची माहीती मिळाली आहे.
पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीणच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या पथकातील हवालदार राकेश पाटील, शशीकांत, रावसाहेब पाटील, चेतन महाजन तसेच होमगार्ड प्रदिप शिरसाठ व पोलीस मित्र महेश कोळी, नरेंद्र मोरे यांनी पार पाडली आहे.